मंत्री संजय राठोड यांच्या विकास कामाचा आम्हाला सार्थ अभिमान: धर्मगुरु जितेंद्र महाराज!
मानोरा (Dharmaguru Jitendra Maharaj) : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे सुरू असलेल्या मंदिर बांधकामाच्या गुणवत्तेबद्दल आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत, अशी स्पष्ट भूमिका धर्मगुरु जितेंद्र महाराज (Dharmaguru Jitendra Maharaj) यांनी व्यक्त केली आहे. तसेच राज्याचे मंत्री ना. संजय राठोड यांनी शासनाकडून मंजूर करून पोहरादेवी येथे केलेल्या विकास कामांबद्दल आम्हाला सारखा अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
धर्मगुरु जितेंद्र महाराज (Dharmaguru Jitendra Maharaj) यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे समाज बांधवांना नम्र आवाहन केले आहे. "पोहरादेवी येथे चालू असलेल्या मंदिर बांधकामाच्या गुणवत्तेबद्दल धर्मगुरु महाराज महंत मंडळीची समाधानी आहे. मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथील केलेल्या विकास कामाबद्दल आम्हाला सारखा अभिमान आहे." पोहरादेवीच्या विकासावरून समाज माध्यमांवर काही संभ्रम निर्माण करणारे पोस्ट, व्हिडीओ आणि मेसेज फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर धर्मगुरु जितेंद्र महाराज यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. समाजातील ऐक्य आणि श्रद्धास्थानाचा विकास याला बाधा पोहोचेल, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. "समाज बांधवांना नम्र आवाहन आहे, आपल्या नेत्याबद्दल समाज माध्यमावरती संभ्रम निर्माण होईल असे पोस्ट करू नका."
बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी हे केवळ मंदिर नसून बंजारा समाजाची अस्मिता, श्रद्धा आणि संस्कृतीचे केंद्र आहे. येथील विकास कामे ही समाजाच्या भावी पिढ्यांसाठी होत आहेत. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी एकजुटीने आणि सकारात्मक भावनेने या विकास कार्यात सहभागी व्हावे, असेही धर्मगुरु जितेंद्र महाराज (Dharmaguru Jitendra Maharaj) यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. धर्मगुरु यांच्या या भूमिकेमुळे पोहरादेवीच्या मंदिर बांधकामावरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, समाजात समाधान व्यक्त केले जात आहे.