धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला तब्बल १२ वर्षे उलटली आहेत.
घोंगडी बैठकीत मल्हारयोद्धे चंद्रकांत हजारे यांचा सरकारला इशारा; १२ वर्षांपासून आश्वासनाची पूर्तता नसल्याने समाजात नाराजी
लातूर : धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला तब्बल १२ वर्षे उलटली आहेत. मात्र, अद्याप या आश्वासनाची पूर्तता झालेली नसल्याने धनगर समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने दिलेला शब्द तातडीने पाळावा, अन्यथा पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मल्हारयोद्धे चंद्रकांत हजारे यांनी दिला.
लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित धनगर समाजाच्या घोंगडी बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिरीष देवकते, शाम गोरे, भरत मोटे, कुमार पांढरे, धनराज माने आणि विठ्ठल तरडे उपस्थित होते.
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाकडून वेळोवेळी आश्वासने देण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी होत नसल्याने समाजातील नाराजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चंद्रकांत हजारे यांनी सांगितले.
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने यापूर्वी राज्यभर विविध आंदोलने, उपोषणे आणि मोर्चे काढले आहेत. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने सकारात्मक भूमिका घेत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नसल्याने समाजासमोर पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
“धनगर समाजाने सरकारवर विश्वास ठेवून आजपर्यंत संयमाची भूमिका घेतली. मात्र, आश्वासनांना १२ वर्षे उलटूनही आरक्षणाची अंमलबजावणी होत नसेल, तर हा समाजाच्या भावनांचा अवमान आहे. सरकारने आता कोणतीही सबब न सांगता दिलेला शब्द पाळावा,” अशी भूमिका चंद्रकांत हजारे यांनी मांडली.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. अन्यथा राज्यभर पुन्हा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा हजारे यांनी दिला.