न्यायालयाने स्थगिती उठवली; परभणीतील पांडुरंग हॉस्पिटल मधील घटना
परभणी (Parbhani Woman Death Case) : शहरातील पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याच्या गाजलेल्या प्रकरणाला आता पुन्हा वेग येणार आहे. या प्रकरणातील तीन डॉक्टरांविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासाला न्यायालयाने हिरवा कंदील दिला असून, यापूर्वी देण्यात आलेली स्थगिती ३१ ऑक्टोबर रोजी उठविण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल काही काळापासून थांबलेला तपास पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पोलीस तपासातून नेमके सत्य बाहेर येणार का आणि मृत महिलेच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सेलू तालुक्यातील करजखेडा येथील भाऊसाहेब पंडितराव झोल यांच्या तक्रारीवरून डॉ. व्यंकटेश डुब्बेवार, डॉ. व्यंकटेश हराळे आणि डॉ. सागर चेउलवार या तीन डॉक्टरांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १८ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने तपासाला स्थगिती दिल्याने पोलिसांची पुढील कारवाई थांबली होती. मात्र, ३१ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने ही स्थगिती उठविल्याने तपास पुन्हा सुरू होणार आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्यांच्या आई निलावतीबाई पांडुरंग झोल यांना छातीत दुखत असल्याने ७ मार्च २०२३ रोजी पांडुरंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर अँजिओग्राफी व त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार होतील, असे सांगण्यात आले असतानाही ६० हजार रुपये भरण्यास सांगून रक्कम घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
अँजिओप्लास्टीदरम्यान सुरुवातीचा प्रयत्न अयशस्वी झाल्याची माहिती नातेवाइकांना देण्यात आली नाही, तसेच पुढील प्रक्रियेदरम्यान रक्तस्राव न थांबल्याने महिलेची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. (Parbhani Woman Death Case) आवश्यक तज्ज्ञांची मदत न घेता उपचार करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. याशिवाय उपचाराच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज मागितल्यानंतर चुकीचे फुटेज देण्यात आल्याचा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन फसवणूक केल्याचाही आरोप तक्रारीत आहे.
या (Parbhani Woman Death Case) प्रकरणात केवळ महिलेच्या मृत्यूचे कारणच नव्हे, तर उपचारासाठी घेतलेली रक्कम, सीसीटीव्ही फुटेजमधील कथित विसंगती आणि उपचार प्रक्रियेतील निर्णयांचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. रुग्णालयातील उपचारांच्या खर्चाबाबत आणि रुग्णांच्या नातेवाइकांकडून मोठ्या रकमा घेतल्या जात असल्याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. मात्र, या चर्चेची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे. तपास नवा मोंढा पोलीस ठाण्याचे सपोनी खंदारे हे करत आहेत.
स्थगिती उठली, आता तपासात दिरंगाई नको!
न्यायालयाने स्थगिती उठविल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती देऊन सर्व संबंधित कागदपत्रे, वैद्यकीय नोंदी, सीसीटीव्ही फुटेज आणि उपचार प्रक्रियेची निष्पक्ष पडताळणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेतील आरोपांची सत्यता समोर येऊन दोषींवर कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. एका कुटुंबाने आपल्या आईच्या मृत्यूला न्याय मिळावा यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आता न्यायालयाच्या आदेशानंतर तपासाचा मार्ग मोकळा झाला असून, या प्रकरणात न्याय मिळणार की पुन्हा प्रतीक्षाच करावी लागणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.