हिंगोली : सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना फसवण्यासाठी नवनवीन फंडे अवलंबण्यास सुरुवात केली असून, या नवीन फंड्यांपासून सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे. ऑक्टोबर हा सायबर सुरक्षा महिना म्हणून साजरा केला जात असून, या अनुषंगाने हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी केले आहे. त्यांनी सायबर गुन्हेगारांच्या नव्या पद्धती उघड करून नागरिकांना सतर्क केले आहे.
ओटीपीच्या माध्यमातून फसवणूक
सध्या सायबर गुन्हेगार ओटीपीच्या माध्यमातून मोठी फसवणूक करत आहेत. तुमचे बँक खाते २४ तासांत बंद होणार आहे किंवा तुमचा मोबाईल नंबर ब्लॉक होणार आहे, असा बनावट मेसेज पाठवून नागरिकांकडून ओटीपी घेतला जातो आणि खात्यातील रक्कम लंपास केली जाते. कोणतीही बँक कधीही फोनवर ओटीपी मागत नाही, हे नागरिकांनी लक्षात ठेवले पाहिजे.
क्यूआर कोड स्कॅन करताना सावधान!
दुसरा प्रकार म्हणजे क्यूआर कोडचा. कॅशबॅक ऑफर आहे किंवा लॉटरी लागली आहे, असे सांगून क्यूआर कोड पाठवला जातो. अनेकांना वाटते की क्यूआर कोड स्कॅन केल्याने पैसे मिळतील; परंतु प्रत्यक्षात स्कॅन केल्यावर त्यांच्या खात्यातून पैसे कट होतात. त्यामुळे अनोळखी क्यूआर कोड अजिबात स्कॅन करू नका.
इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचा वाढता धोका
इन्व्हेस्टमेंट फ्रॉड हा सर्वात धोकादायक प्रकार बनला आहे. सोशल मीडियावर जास्त परताव्याची जाहिरात दाखवून नागरिकांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडले जाते. सुरुवातीला थोडा नफा दाखवून विश्वास संपादन केला जातो आणि नंतर मोठी रक्कम गुंतवायला लावून संपूर्ण पैसे घेऊन पोबारा केला जातो.
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रकार
सध्या चर्चेत असलेला प्रकार म्हणजे डिजिटल अरेस्ट. स्वतःला दिल्ली पोलीस, सीबीआय, ईडी किंवा कस्टम अधिकारी असल्याचे सांगून तुमच्या नावावर पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहे किंवा तुमच्या नावावर गुन्हा दाखल आहे, असे सांगितले जाते. व्हिडिओ कॉलवर डिजिटल अरेस्ट केले आहे, असे सांगून घाबरवून पैसे उकळले जातात. अशा प्रकारे कोणतीही यंत्रणा डिजिटल अरेस्ट करत नाही, हे स्पष्ट आहे.
केवायसी अपडेटच्या नावाखाली वैयक्तिक माहितीची चोरी
केवायसी अपडेट करणे गरजेचे आहे, अन्यथा तुमचे खाते बंद होईल, असा मेसेज पाठवून त्यामध्ये एक लिंक दिली जाते. त्या लिंकवर क्लिक केल्यास तुमची सर्व वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते.
फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधा
या सर्व फसवणुकीपासून वाचण्यासाठी हिंगोली पोलिसांनी ‘Be Aware, Be Safe, Be Cyber Smart’ आणि ‘Think Before You Click’ हा संदेश दिला आहे. ‘जागरूक नागरिक, सुरक्षित हिंगोली’ हा संकल्प करून सर्वांनी सायबर साक्षर होण्याची गरज आहे.
जर कोणत्याही प्रकारे तुमची फसवणूक झाली असेल किंवा संशयास्पद कॉल आला असेल, तर तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधा किंवा हिंगोली सायबर पोलीस स्टेशनला भेट देऊन तक्रार नोंदवा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी केले आहे.