प्रवाशांच्या सतर्कतेने महिलेचा जीव वाचला; उपचारादरम्यान हात कापावा लागला
चिखली (Chikhli Bus Station Accident) : चिखली बस स्थानकात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक थरारक व भीषण अपघात घडला. बार्शी ते शेगाव या एसटी बसच्या चाकाखाली चिरडल्याने एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा हात गंभीररीत्या निकामी झाला. निर्मला आनंदराव देशमुख (वय ७५) राहणार धोत्रा भंनगोजी असे या जखमी वृद्ध महिलेचे नाव असून, त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी आगाराची बार्शी–शेगाव बस (क्रमांक एमएच १४ बीटी ५०६४) चिखली बस स्थानकात आली. बस चालक सुदर्शन भिमाजी बांगर याने बस नेहमीच्या प्रवेशद्वारातून न आणता, बस बाहेर पडण्याच्या (एक्झिट) गेटमधून थेट आत घुसवली. त्याच वेळी गेटमधून पायी जाणाऱ्या निर्मला देशमुख यांना बसची जोरदार धडक बसली. धडक बसताच त्या खाली पडल्या. सुदैवाने त्यांचे शरीर बसच्या चाकाखाली गेले नाही; मात्र उजवा हात पुढील चाकाखाली अडकून चिरडला गेला.
चालकाचे पलायन, प्रवाशांचे धाडस
अपघात घडताच प्रवाशांनी आरडाओरड केली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून चालक बांगर याने (Chikhli Bus Station Accident) बसमधून उडी मारून घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, बसमधील एका सजग प्रवाशाने प्रसंगावधान राखत बस किंचित पुढे घेतली, तर उपस्थित सेवाभावी नागरिकांनी तात्काळ बसखाली जाऊन महिलेचा हात चाकाखालून बाहेर काढला. नागरिकांनी तातडीने निर्मला देशमुख यांना सरकारी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, हात अत्यंत गंभीररीत्या चिरडल्यामुळे डॉक्टरांना तो कोपरापासून कापावा लागला. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पोलिसांत नोंद नाही; मुले पुण्यात असल्याने तक्रार प्रलंबित
घटनेनंतर आगार अधिकारी मगर व सागर परदेशी यांनी चिखली पोलीस ठाण्याला माहिती दिली. (Chikhli Bus Station Accident) चिखली आगाराने संबंधित बस पोलीस ठाण्यात जमा केली असून, पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) सुसर पुढील तपास करत आहेत. जखमी महिलेची दोन्ही मुले पुणे येथे वास्तव्यास असून, ते चिखलीत पोहोचेपर्यंत कुटुंबाकडून तक्रार दाखल झालेली नव्हती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी अधिकृत गुन्हा नोंद झाला नव्हता.
चिखली आगार बनले समस्यांचे माहेरघर
घाटमाथ्यावरील अत्यंत महत्त्वाचे जंक्शन असलेले चिखली बस स्थानक सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.
वारंवार होणारे अपघात: महिन्याभरापूर्वीच याच ठिकाणापासून अवघ्या ५० फुटांवर एका महिलेला बसने धडक दिली होती. सुदैवाने त्या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली होती.
खड्डे आणि धूळ: बस बाहेर पडण्याच्या मुख्य गेटवर तसेच संपूर्ण आगार आवारात मोठमोठे खड्डे पडले आहेत. बसेस ये-जा करताना प्रचंड धूळ उडत असल्याने प्रवाशांना श्वसनाचा व डोळ्यांचा त्रास सहन करावा लागतो.
अस्वच्छता व दुर्गंधी: आगारात मुतारी लांब असल्याने अनेक जण स्थानकासमोरील मोकळ्या जागेतच लघुशंका करतात. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून महिला प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खासगी प्रवासी वाहतूकदारांची मनमानी
नियमांनुसार (Chikhli Bus Station Accident) बस स्थानकापासून २०० मीटर अंतरापर्यंत खासगी प्रवासी वाहनांना बंदी आहे. याबाबत आरटीओ, पोलीस अधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांच्या उपस्थितीत बैठका घेऊन निर्देशही दिले होते. मात्र, प्रत्यक्षात गेटवरच खासगी वाहने उभी राहत असल्याने एसटी बसेसना आत-बाहेर करताना मोठा अडथळा निर्माण होतो. एजंट थेट बसच्या दारात येऊन कमी भाड्याचे आमिष दाखवत प्रवासी पळवत आहेत. सुरक्षा रक्षक, वाहतूक पोलीस किंवा आगार प्रशासनाचा वचक नसल्याने आगाराच्या महसुलाला मोठा फटका बसत आहे.
महिलेच्या उपचाराचा सर्व खर्च एसटी करणार: आगार व्यवस्थापक
"अपघातग्रस्त वृद्ध महिला निर्मला देशमुख यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रशासनाकडून प्राथमिक मदत म्हणून १,००० रुपयांची रोख मदत देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या नियमांनुसार, रुग्णालयात दाखल केल्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंतचा संपूर्ण वैद्यकीय खर्च एसटी महामंडळ करणार आहे."
-संतोष जोगदंडे, आगार व्यवस्थापक, चिखली