रायमूलकरांचा उपोषणाचा इशारा, तर सरनाईकांचे ‘एकतर्फी निर्णय न घेता समान न्याय द्या’ असे आवाहन
चिखली (Chikhali Pentakali Project) : पेनटाकळी प्रकल्पातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून चिखली आणि मेहकर तालुक्यांत राजकीय व शेतकरी पातळीवर चांगलाच वाद पेटला आहे. एका बाजूला नदीपात्रात पाणी सोडण्यास विरोध होत असल्याचा आरोप करत मेहकरचे माजी आमदार संजय रायमूलकर यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे, तर दुसऱ्या बाजूला चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून एकतर्फी निर्णय न घेता दोन्ही तालुक्यांना समान न्याय द्यावा, अशी ठाम भूमिका शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी मांडली आहे.
पाणी न सोडल्यास नदीपात्रात उपोषण करणार: माजी आमदार संजय रायमूलकर
मेहकर येथील संतप्त शेतकऱ्यांनी पेनटाकळी प्रकल्पावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्यानंतर शेतीसाठी पाणी सोडण्यास प्रशासन राजी झाले होते; मात्र चिखलीच्या आमदार श्वेता महाले व नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी प्रकल्पावर जाऊन विरोध केल्याने पाणी सोडणे थांबल्याचा आरोप मेहकर परिसरातील शेतकऱ्यांनी केला.
यावरून आक्रमक झालेले माजी आमदार संजय रायमूलकर यांनी, "शेतकऱ्यांनी पदरमोड करून बंधाऱ्यांची दुरुस्ती केली आणि मोटारी बसवल्या असताना तोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे," अशी टीका केली. जर पाणी सोडण्यात आले नाही, तर पैनगंगा नदीपात्रात उपोषण करण्याचा इशारा रायमूलकर यांनी दिला आहे. तसेच नदीकाठच्या शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत, पाणी न सुटल्यास जनावरे आमदार श्वेता महाले यांच्या बंगल्यासमोर नेऊन बांधण्याचा इशाराही दिला होता.
राजकारण न करता समान न्याय द्या; जनावरे घेऊन येण्यापेक्षा आम्हीच तुमच्याकडे येऊ: विनायक सरनाईक
या वादावर प्रत्युत्तर देताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी सदस्य तथा शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांची बाजू मांडली. ते म्हणाले की, नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत प्रसारित झालेल्या व्हिडिओमुळे चिखली तालुक्यातील वरखेड, नायगाव खुर्द, पेनसावंगी, भोरसा-भोरसी, मंगरूळ नवघरे आणि डोंगरगाव आदी गावांतील शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम व भीती निर्माण झाली होती. चिखली भागातील हळद, तूर आणि जनावरांचा चारा वाचवण्यासाठी किमान दोन पाण्याच्या पाळ्यांची तातडीची गरज आहे.
आमदार श्वेता महाले यांच्या भूमिकेचा विपर्यास करून गैरसमज पसरवले जात असल्याचे सांगत सरनाईक म्हणाले, "आमदार महाले यांनी चिखलीतील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मांडला आहे. खासदार हे संपूर्ण जिल्ह्याचे पालक आहेत. त्यामुळे केवळ एकाच तालुक्याचा विचार न करता संपूर्ण मतदारसंघाला समान न्याय दिला पाहिजे."
माजी आमदार रायमूलकर यांच्या जनावरे आणण्याच्या विधानावर बोलताना सरनाईक यांनी सडेतोड उत्तर दिले, "खासदार आमचेही पालक आहेत. एकतर्फी निर्णय घेऊन जर चिखलीच्या पिकांवर आणि जनावरांवर संकट आले, तर तुमची जनावरे आमच्याकडे आणण्यापेक्षा आम्हीच आमच्या जनावरांसह खासदारांच्या दारात राहायला येऊ."
पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
या वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीवाटपाबाबत अद्याप अंतिम किंवा एकतर्फी निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. आगामी ४ तारखेला पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून, दोन्ही शहरांसाठी पिण्याचे पाणी राखीव ठेवून उर्वरित पाण्याचे समन्यायी नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे राजकीय श्रेयवाद आणि शेतकऱ्यांमधील दुरावा टाळत प्रशासन दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना कसा दिलासा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.