काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रों की गुंज' कार्यक्रमापूर्वी COEP कॉलेज परिसरात काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.
'छात्रों की गुंज' कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर COEP कॉलेज परिसरात तणाव; पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न
पुणे : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रों की गुंज' कार्यक्रमापूर्वी COEP कॉलेज परिसरात काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही गटांमधील वाद शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राहुल गांधी यांचा 'छात्रों की गुंज' (Chhatron Ki Goonj Pune) हा कार्यक्रम शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राहुल गांधी देशभरातील युवकांशी संवाद साधणार आहेत. मात्र, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच COEP कॉलेज परिसरात काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला.
या घटनेनंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे देखील घटनास्थळी पोहोचले.
युवक काँग्रेसने एबीव्हीपीच्या काही कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. एबीव्हीपीचे कार्यकर्ते COEP कॉलेज परिसरात येऊन तेथील तरुणांना धमकावत होते, तसेच राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये यासाठी दबाव टाकत होते, असा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.
या घटनेनंतर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने परिसरात जमा झाल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनल्याचे दिसून आले. दोन्ही गटांतील वाद मिटवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.