भीषण अपघात तरुण मृत्यू

चकपिरंजी येथे भीषण अपघात; २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Chakpiranji Accident Youth Death: चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली तालुक्यातील चकपिरंजी येथे भरधाव दुचाकीने पायी जात असलेल्या युवकाला जोरदार धडक दिल्याने २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

चकपिरंजी येथे भीषण अपघात; २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Chakpiranji Accident Youth Death

 

दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

सावली (Chakpiranji Accident Youth Death) : चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली तालुक्यातील चकपिरंजी येथे भरधाव दुचाकीने पायी जात असलेल्या युवकाला जोरदार धडक दिल्याने २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले.  सिद्धांत लाडे (२६) असे मृतक युवकाचे नाव आहे . बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास चकपिरंजी येथे हा भीषण अपघात घडला. अवघ्या १५ दिवसांपूर्वी याच परिसरात एका सात वर्षीय बालकाचा अपघाती मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एका तरुणाचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या (Chakpiranji Accident Youth Death) अपघातात सिद्धांत सुभाष लाडे (वय २६, रा. चकपिरंजी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दादाजी रमेश फाले (वय २०) आणि राकेश उमाजी फाले (वय २२, दोघेही रा. रय्यतवारी) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, दादाजी फाले आणि राकेश फाले हे दोघे मित्र एमएच ३४ सीयू ९०४२ क्रमांकाच्या पल्सर दुचाकीने सावली येथून व्याहाडमार्गे आपल्या गावाकडे जात होते. दरम्यान, चकपिरंजी येथील क्रीडांगणाच्या कामावरून पायी घरी परतत असलेले सिद्धांत लाडे हे राष्ट्रीय महामार्गावरील ऋषीदेव कोलते यांच्या घराजवळ आले असताना भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सिद्धांत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दोघे मित्र रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तरुण वयात सिद्धांत लाडे यांचा मृत्यू झाल्याने चकपिरंजी परिसरावर शोककळा पसरली आहे. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या १५ दिवसांपूर्वी याच परिसरात रस्ता ओलांडताना आर्या पुंडलिक वाडगुरे (वय ७) या बालकाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या घटनेतून परिसरातील नागरिक सावरत असतानाच पुन्हा एका तरुणाला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. एकाच परिसरात अल्पावधीत घडलेल्या या दोन घटनांमुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज  निर्माण झाली आहे.

चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. अशा परिस्थितीत वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करणे, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात असताना भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.