निवळी येथील घटना; पंचनामा व नुकसानभरपाईची मागणी
पाथरी (Parbhani sugarcane Burn) : तालुक्यातील निवळी शिवारात शेतातून गेलेल्या महावितरणच्या मुख्य वीजवाहिनीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने दिड एकर क्षेत्रातील उभ्या ऊसाला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना गुरुवार ८ ऑक्टोबर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकर्याने महावितरणच्या पाथरी कार्यालयाकडे केली आहे.
निवळी येथील शेतकरी नारायण डिगांबर लिपणे यांची निवळी शिवारातील गट क्रमांक ४९ मध्ये शेती असून त्यापैकी दिड एकर क्षेत्रात ऊसाचे पीक घेतले होते. गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास शेतातून गेलेल्या मुख्य वीजवाहिनीमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या ऊसाच्या पिकावर पडल्या. त्यामुळे ऊसाला आग लागली. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उभा ऊस जळून खाक झाला आहे.
ऐन काढणीच्या तोंडावर पीक जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा लिपणे यांनी केला आहे. (Parbhani sugarcane Burn) दुष्काळी परिस्थितीत या नुकसानीमुळे आर्थिक अडचण निर्माण झाली असून मानसिक तणाव वाढल्याचे पाथरी येथील महावितरणच्या उपअभियंता कार्यालयाला दिलेल्या अर्जात नमूद केले आहे. महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, अधिकृत पंचनामा करावा आणि नुकसानीची योग्य ती भरपाई मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.