चिखली अर्बन बँकेची मुदत ठेव;
अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांचा पुढाकार, संचालक अंकुशराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश
चिखली (Buldhana District Bank) : आर्थिक अडचणींवर मात करून बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना आता विविध स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. बँकेवरील शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी नवनिर्वाचित संचालक अंकुशराव पाटील यांनीही पुढाकार घेतला आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून विदर्भातील पहिली नागरी सहकारी बँक असलेल्या चिखली अर्बन बँकेने बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत तब्बल पाच कोटी रुपयांची मुदत ठेव ठेवून बँकेला मोठे आर्थिक बळ दिले आहे.
यापूर्वी चिखलीचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी जिल्हा बँकेत एक कोटी रुपयांची ठेव ठेवून विश्वासाचा हात पुढे केला होता. त्यानंतर आता चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी पाच कोटी रुपयांची ठेव शाखा चिखली येथे जमा केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या ठेववाढीच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे.
जिल्हा बँकेचे (Buldhana District Bank) अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या ठेववाढीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, नवनिर्वाचित संचालक अंकुशराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी बँकेचे मुख्य व्यवस्थापक एस. एस. चेके, शाखा व्यवस्थापक के. एस. म्हस्के आणि तालुका सचिव जी. एस. गायकवाड उपस्थित होते. ठेववाढीसाठी आत्मीयतेने प्रयत्न करणारे संचालक अंकुशराव पाटील तसेच पाच कोटींची मुदत ठेव दिल्याबद्दल डॉ. आशुतोष गुप्ता यांचे बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी आपली भावना व्यक्त करताना डॉ. आशुतोष गुप्ता म्हणाले की, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारी संस्था आहे. गोरगरीब आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ही बँक जीवनदायिनी ठरली आहे. अशा बँकेचे पुनरुज्जीवन होताना पाहून मनापासून आनंद होत आहे. संचालक अंकुशराव पाटील यांच्या विनंतीवरून चिखली अर्बन बँकेने हा निर्णय घेतला आहे.
जिल्हा केंद्रीय सहकारी बँक आणि चिखली अर्बन बँकेचे ऋणानुबंध जुने असून, केवळ व्यावसायिक संबंध नव्हे तर जनसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत दोन्ही संस्था कार्यरत आहेत. जिल्हा बँकेची ही दमदार सुरुवात पाहता आता खऱ्या अर्थाने ‘पुनश्च हरिओम’ झाल्याची भावना डॉ. गुप्ता यांनी व्यक्त केली. जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी राजकीय नेतृत्व, नवनिर्वाचित संचालक आणि सहकारी क्षेत्रातील संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. पाच कोटींच्या या ठेवीमुळे केवळ आर्थिक बळच मिळाले नाही, तर जिल्हा बँकेवरील विश्वास पुनर्स्थापित करण्याच्या प्रयत्नांनाही नवी ऊर्जा मिळाली आहे.