विदर्भ नागरी सहकारी पतसंस्थेचा पुढाकार;
अध्यक्ष भास्कर डुकरे यांच्याकडून डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे धनादेश सुपूर्द
चिखली (Buldhana Central Cooperative Bank) : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. बँकेला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी यापूर्वी अनेक राजकीय पातळ्यांवर प्रयत्न केले. आता बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बँकेचे आर्थिक बळ वाढविण्यासाठी त्यांनी सहकार क्षेत्रातील संस्था, पतसंस्था आणि समाजातील ठेवीदारांना बँकेत ठेवी ठेवण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. शिंगणे यांच्या या आवाहनाला सहकार क्षेत्रातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, चिखली येथील विदर्भ नागरी सहकारी पतसंस्थेने एक कोटी रुपयांची मुदत ठेव (एफडीआर) बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष भास्कर डुकरे यांनी एक कोटी रुपयांचा धनादेश डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सुपूर्द करून जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनावर विश्वास व्यक्त केला.
बुलढाणा येथील (Buldhana Central Cooperative Bank) बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये जिल्ह्यातील विविध सोसायट्या, सहकारी संस्था आणि पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा बँकेच्या आर्थिक बळकटीकरणासाठी सहकार क्षेत्रातील संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भास्कर डुकरे यांनी एक कोटींच्या ठेवीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी डॉ. मगर, डॉ. प्रकाश शिंगणे यांच्यासह जिल्हाभरातील सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विशेष म्हणजे, चिखली शहरातून आतापर्यंत तीन ठेवीदारांनी जिल्हा बँकेत एकूण सात कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या आर्थिक बळकटीकरणासाठी चिखली शहरातून मिळत असलेला प्रतिसाद महत्त्वपूर्ण ठरत आहे. जिल्हा बँकेला पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करून सहकार क्षेत्रात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे, संचालक अंकुशराव पाटील आणि संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू असून, विदर्भ नागरी सहकारी पतसंस्थेने दिलेला एक कोटींच्या ठेवीचा हातभार हा या प्रयत्नांना बळ देणारा ठरला आहे.