आक्षेपानंतर काही काळ मतमोजणी थांबली; सील तुटलेल्या पेट्या बाजूला ठेवून उर्वरित मोजणी पारदर्शकपणे करण्याची प्रतिनिधींची मागणी
पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीदरम्यान काही मतपेट्यांच्या सीलवरून वाद निर्माण झाला. आठ मतपेट्यांना सील नसल्याचा दावा करत महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी आक्षेप नोंदवला. या मुद्द्यावर निवडणूक अधिकारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा व गोंधळ झाल्याने मतमोजणी काही काळ थांबवण्यात आल्याची माहिती आहे.
शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण १८२ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांत बंद झाले होते.
महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, काही मतपेट्यांवरील तारा आणि लाखेची सील तुटलेली दिसली. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले. मात्र, तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आणि रेकॉर्डिंग कधी उपलब्ध होईल याची स्पष्टता दिली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. निवडणूक निरीक्षकांसमोरही मुद्दा मांडला, पण मतमोजणी सुरू ठेवण्यास सांगण्यात आल्याचे प्रतिनिधींनी म्हटले.
अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान कागदी सील असल्याचे सांगून प्रक्रिया पुढे चालू ठेवण्यास सांगितल्याचा दावा प्रतिनिधींनी केला. त्यांच्या मते, सात ते आठ पेट्यांचे सील तुटलेले होते. त्या पेट्यांतील मते कोणाला पडली, हे माहीत नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकाराची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली.
प्रतिनिधींनी मतमोजणी पूर्णपणे थांबवण्याची मागणी नसल्याचे स्पष्ट केले. सील तुटलेल्या पेट्या बाजूला ठेवून उर्वरित मतपेट्यांची मोजणी सुरू ठेवावी आणि प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी, अशी त्यांची भूमिका आहे. सुरुवातीला कागद-पेन आत नेऊ दिले नसल्याचा, तसेच लेखी आक्षेप नोंदवण्यात अडथळे आल्याचा आरोपही त्यांनी केला. आक्षेपानंतर त्यांना कागद-पेन देण्यात आल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.