मोझरच्या बाबुळगाव शिवारातील अजगराची थरारक घटना
नेर (Babulgaon farmland Python) : नेर तालुक्यातील मोझर येथील बाबुळगाव शिवारात एका विशाल अजगराने बकरीला गिळल्याची थरारक घटना समोर आली असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोझर येथील पशुपालक बाळू त्र्यंबक शिंदे हे आपल्या मेंढ्या व बकऱ्यांना घेऊन बाबुळगाव शिवारात गेले होते. यावेळी अचानक त्यांच्या नजरेस सुमारे १० ते १२ फूट लांबीचा एक मोठा अजगर पडला. एवढ्या विशाल अजगराला पाहून ते काही काळ हादरून गेले.
दरम्यान, या अजगराने एका बकरीला आपल्या मजबूत विळख्यात घेतले होते. बकरीची हालचाल थांबल्यानंतर काही वेळातच अजगराने तिला गिळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. हा अंगावर काटा आणणारा प्रकार पाहून बाळू शिंदे यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना माहिती दिली. घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच परिसरात एकच चर्चा सुरू झाली. बाबुळगाव शिवारात अजगराचा वावर असल्याने शेतकरी व पशुपालकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे. वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.