Ausa Garbage Crisis: घंटागाडीतून औषध फवारणीचे रील्स टाकणाऱ्या औसा शहराच्या नगराध्यक्षांना शहरात जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग दिसत नाहीत का? आता संतप्त सवाल औसेकर करीत आहेत.
औसेकरांचा संताप; कचऱ्याचे साम्राज्य वाढले, दुभाजकात घाणच घाण!
औसा (Ausa Garbage Crisis) : घंटागाडीतून औषध फवारणीचे रील्स टाकणाऱ्या औसा शहराच्या नगराध्यक्षांना शहरात जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग दिसत नाहीत का? आता संतप्त सवाल औसेकर करीत आहेत. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून शहरातील या घाणीकडे प्रभारी नगराध्यक्षांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. औसा शहरात अनेक भागांत कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ रस्ते आणि साचलेल्या घाणीमुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. समस्या सोडविण्याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
दरम्यान, स्वच्छतेच्या प्रश्नावर नगराध्यक्षांनी जबाबदारी झटकत संबंधित विभागाकडे बोट दाखवल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना नागरिकांना मात्र अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. नगरपालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून कचरा संकलन, रस्ते सफाई आणि नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रभागात घंटागाडी येत नसल्याने प्रभागातील नागरिक वारंवार तक्रार करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. परंतु पालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते.
कचरा संकलनासाठी कचरा गाडी येत नसल्याने दुकान मालक आपला कचरा रस्त्यावरील दुभाजकात व नालीत टाकत असल्याचे चित्र सध्या औसा शहरांमध्ये दिसून येत आहे. स्वच्छतेचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
साहित्य आमच्या अखत्यारित नाही!
"स्वच्छतेचे साहित्य आमच्या अखत्यारित राहिले नाही व आमच्या (Ausa Garbage Crisis) सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे काम करू दिले जात नसल्याने शहरात जी घाण होत आहे, यास आमचे प्रशासन जबाबदार नाही. कारण आम्हाला काम करू दिले जात नसल्याचा आरोप प्रभारी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी केला. ज्यावेळी आमच्याकडे संपूर्ण साहित्य ताब्यात दिले जाईल, त्या वेळेला आम्ही स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावू, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
टेंडर धारकांनी वाढीव पेमेंट मागितले...
टेंडर धारकांनी वाढीव पेमेंट मागितले आहे. माझे संबंधितांशी बोलणे झाले आहे. मी ट्रेनिंग संदर्भात बाहेर असल्याने प्रश्न मार्गी लागला नव्हता. लवकरच स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल व नियमितपणे स्वच्छता केली जाईल.
- मंगेश शिंदे, मुख्याधिकारी नगरपालिका, औसा