औंढा नागनाथ पंचायत समिती

दुष्काळी परिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; उपाययोजनांसाठी प्रशासनाला निर्देश

Aundha Nagnath Panchayat Samiti: आगामी काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजनांचे तातडीने नियोजन करावे...

दुष्काळी परिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; उपाययोजनांसाठी प्रशासनाला निर्देश

Aundha Nagnath Panchayat Samiti

 

औंढा नागनाथ प्रतिनिधी पंचायत समिती सभागृहात येथे विशेष बैठक;
पाणीटंचाई, चारा टंचाई आणि जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करण्यावर भर

औंढा नागनाथ (Aundha Nagnath Panchayat Samiti) : आगामी काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजनांचे तातडीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. औंढा नागनाथ येथील पंचायत समिती सभागृहात बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने विशेष आढावा बैठक घेण्यात आली.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत संभाव्य दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाणीटंचाई व चारा टंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजना, संभाव्य टंचाई कृती आराखडा आणि जलसंधारणाच्या प्रस्तावित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश
आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी संबंधित विभागांनी पूर्वनियोजन करावे. संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करून त्यास आवश्यक मंजुरी घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी आणि परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा
बैठकीत जलजीवन मिशनअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्था, उपलब्ध पाण्याचे स्रोत आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. पाण्याचे स्रोत असलेल्या गावांचे नकाशे तयार करणे, पाणी उपशाचे नियोजन करणे आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य वापर करण्याबाबतही आढावा घेण्यात आला.

चारा टंचाई आणि जलसंधारणावर भर
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने चारा टंचाईचे नियोजन आणि चारा बंदीबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय VB-GRAMG अंतर्गत सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित जलसंवर्धनविषयक कामांचा आढावा घेण्यात आला. जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवून भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर भर देण्यात आला.

अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून सतर्क राहावे
आगामी काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाई लक्षात घेता सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. कोणत्याही कर्मचाऱ्याने मुख्यालय सोडू नये, मुख्यालयी राहून परिस्थितीवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सतर्क राहावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. टंचाईच्या परिस्थितीत नागरिकांना वेळेत मदत मिळावी आणि पाणीपुरवठ्याबाबतच्या समस्या तातडीने सोडविल्या जाव्यात, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करण्याचे निर्देशही देण्यात आले.

या बैठकीला उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरीश गाडे, गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे पाटील, तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धनंजय उपलवाड, पाणीपुरवठा अभियंता राजेश नरवाडे यांच्यासह तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामविकास अधिकारी, महसूल मंडळ निरीक्षक आणि तलाठी उपस्थित होते. दुष्काळी परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पाणीटंचाई आणि चारा टंचाईचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशा जिल्हाधिकाऱ्याने विविध सूचना दिल्या.