मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिल्याची माहिती आहे. या क्लिपमध्ये ५०० कोटी रुपये आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. क्लिपमधील आवाज कोणाचा आहे आणि त्यातील आरोपांमध्ये तथ्य आहे का, याचा तपास आता एसआयटीकडून केला जाणार आहे.
या ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. क्लिपमध्ये भाजप नेत्यांचे आवाज असल्याचा दावा शिंदे गटातील काही नेत्यांनी केला आहे. भाजपने मात्र या प्रकरणाशी पक्षाचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. क्लिप कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तयार केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे तिची सत्यता तपासली पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे.
या मुद्द्यावर महायुतीतील भाजपा आणि शिवसेना नेते आमनेसामने आले आहेत. शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के आणि उदय सामंत यांनी भाजपवर टीका केली. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिंदे गटातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदनही दिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांचे विशेष पथक स्थापन केले जाणार असून, जरांगे यांनी समोर आणलेल्या कथित क्लिपची तपासणी होईल. त्यातील आवाजाची ओळख निश्चित करण्याबरोबरच क्लिपमध्ये केलेल्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हेही तपासले जाणार आहे. तपासातून काय निष्पन्न होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.