जालना शहरात बैल घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाला अडवून मारहाण केल्याचा तसेच जातीवाचक अपशब्द वापरल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
कन्हैयानगर टी-पॉईंटजवळ 23 मे रोजी घडल्याचा दावा; सहा गोरक्षकांविरोधात ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमांखाली गुन्हा
जालना : जालना शहरात बैल घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाला अडवून मारहाण केल्याचा तसेच जातीवाचक अपशब्द वापरल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यावेळी वाहनचालकाच्या तोंडात जबरदस्तीने शेण कोंबल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ चित्रीत करून तो इन्स्टाग्रामवर प्रसारित करण्यात आल्याचे पीडिताचे म्हणणे आहे.
ही घटना 23 मे रोजी कन्हैयानगर टी-पॉईंट परिसरात घडली. व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर पीडित परमेश्वर हिवाळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर जालना तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यासह मारहाणीच्या गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कन्हैयानगर टी-पॉईंटजवळ वाहन अडवले
मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर हिवाळे हे मारुती कांबळे यांच्या मालकीचा बैल आठवडी बाजारातून वाहनाने घेऊन जात होते. कन्हैयानगर टी-पॉईंटजवळ त्यांचे वाहन थांबवण्यात आले. यावेळी वाहनाची कागदपत्रे तसेच बैल खरेदीची पावती दाखवण्याची मागणी करण्यात आली.
यानंतर परमेश्वर हिवाळे यांना वाहनातून खाली उतरवून मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यांच्याशी जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली तसेच तोंडात जबरदस्तीने शेण कोंबण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय त्यांच्या मुलाला मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ प्रसारित
या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण करून संबंधित व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आल्याचा आरोप परमेश्वर हिवाळे यांनी केला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार व्यंकटेश भगत, अर्जुनसिंह, रितेश देशमुख, शिवराम पिछाडे, एसरकटे आणि सोमेश पाटील या सहा जणांवर आरोप करण्यात आला आहे. संबंधितांनी आपण बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचे सांगितल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित झाल्याने आपली बदनामी झाल्याचे परमेश्वर हिवाळे यांनी म्हटले असून, या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
या तक्रारीच्या आधारे जालना तालुका पोलिसांनी सहा जणांविरोधात मारहाण आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.