छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनल लढविणार १४ जागा
लातूर (Arvind Patil Nilangekar) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हक्काची बँक असून ती व्यापाऱ्यांच्या हाती आहे, असा आरोप करीत ही बँक व्यापाऱ्यांच्या हातून काढून शेतकरी हीत जोपासण्यासाठी आम्ही बँकेच्या निवडणुकीत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनल उभे केले आहे. आमच्या पॅनलच्या शोभा अभिमन्यू पवार या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या असून या पॅनलच्या वतीने आम्ही संचालक पदाच्या १४ जागा लढवतोय, अशी घोषणा अरविंद पाटील निलंगेकर यांनी केली.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद पाटील यांनी बुधवारी आपली भूमिका स्पष्ट केली. न्यायालयाने मला, आमचे उमेदवार गोविंदराव माकणे, धर्मपाल देवशेट्टे यांना न्याय दिला, असे सांगून आपण या निवडणुकीत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी द्यावीत, असा पुनरुच्चार त्यांनी केला. बँकेच्या निवडणुकीत मतदार आमच्या पॅनलच्या बाजूने कौल देतील, असा विश्वास निलंगेकर यांनी व्यक्त केला.
बँकेच्या मतदार यादीत विरोधकांच्या संस्थांना मतदार करून का घेतले नाही? राज्यभरात जिल्हा बँकांचे मतदार ९ ते १० हजारांवर असताना लातूर जिल्हा बँकेचे ९९९ इतकेच मतदार का? असा सवाल त्यांनी केला. उद्यापासून बँकेच्या सत्ताधाऱ्यांना आमचे अनेक प्रश्न आहेत. ते मांडत राहू, असे अरविंद पाटील निलंगेकर यावेळी म्हणाले. या पत्रकार परिषदेस ऋषीकेश कराड, भरत चामले, गिरीश पाटील, बाबुराव खंदाडे यांच्यासह अन्य उमेदवार उपस्थित होते.