कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना शिंदे गटाचे संचालक कांतराव हराळ यांनी सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सादर केला आहे.
बाजार समितीच्या नव्या सभापतीची निवड लवकरच; सोंडु पाटील यांच्या नावाची चर्चा
सेनगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना शिंदे गटाचे संचालक कांतराव हराळ यांनी सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सादर केला आहे. आगामी काही दिवसांत नव्या सभापतीची निवड होणार आहे. नव्या सभापतीपदासाठी शिवसेना (उबाठा) गटाचे संचालक सोंडु पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात भाजपचे सात, शिवसेना (उबाठा) गटाचे पाच, तर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थक शिवसेना शिंदे गटाचे तीन संचालक आहेत. या राजकीय समीकरणामुळे नव्या सभापती निवडीकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कांतराव हराळ यांनी जवळपास वर्षभरापूर्वी बाजार समितीच्या सभापतीपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर त्यांनी बाजार समितीचा कारभार पाहिला. मात्र, नुकताच त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे आता बाजार समितीच्या नव्या सभापतीची निवड करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
निवडणुकीपूर्वी संचालक मंडळातील राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरणार असून, कोणत्या गटाला सभापतीपद मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना (उबाठा) गटाचे संचालक सोंडु पाटील यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सभापतीपदाच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाजार समितीचा कारभार नव्या सभापतीच्या हाती जाणार आहे. त्यामुळे आगामी निवडीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते आणि बाजार समितीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी नवे नेतृत्व कोणती दिशा देते, याकडे सेनगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.