अज्ञाताने केला धारदार शस्त्राने वार; शेतकर्याचे दहा लाखांचे नुकसान
पूर्णा (Parbhani Animal deaths) : तालुक्यातील पांगरा ढोणे–बरबडी शिवरस्त्यावरील गट क्रमांक २६१ मधील शेतकर्याच्या आखाड्यावर अज्ञात व्यक्तींनी जनावरांवर अमानुष हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवार २५ ऑक्टोबर रोजी पहाटे उघडकीस आली. या हल्ल्यात दोन जनावरे ठार, तर चार जनावरे गंभीर जखमी झाली. या घटनेत शेतकर्याचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, परिसरात संताप व्यक्त होत आहे.
पांगरा ढोणे येथील अल्पभूधारक शेतकरी आनंदा नागोराव ढोणे यांचा गट क्रमांक २६१ मध्ये जनावरांचा आखाडा आहे. शनिवार २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी जनावरांचे दूध काढून ते गावाकडे गेले होते. रविवारी पहाटे चारच्या सुमारास आखाड्यावर पोहोचताच त्यांना दोन जनावरे मृतावस्थेत आढळली. त्यामध्ये एक लाल कंधारी गोरा आणि एका वगारीचा समावेश होता. अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने जनावरांच्या गुप्तांगावर, शिंगांवर व शेपटीवर वार केल्याचे दिसून आले. यात चार जनावरे गंभीर जखमी झाली. त्याच गटातील शेतकरी गोविंद भाऊराव राठोड यांच्या म्हशीलाही गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच शेतकरी ढोणे यांनी नातेवाइकांसह गावातील पोलीस पाटलांना कळविले. त्यानंतर चुडावा पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच चुडावा पोलिसांनी घटनास्थळी (Parbhani Animal deaths) धाव घेऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कसबे यांनी जखमी जनावरांवर प्राथमिक उपचार केले. पुढील तपासणी, उपचारांसाठी जनावरांना परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात नेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ऐन दुष्काळात जनावरांवर झालेल्या या हल्ल्यामुळे शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या अमानुष कृत्यात सहभागी असणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. चुडावा पोलीस ठाण्याचे एपीआय शिवाजीराव सिंगनवाड, पोलीस बीट अंमलदार अनिल मुंडे व आनंदा तोंडेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
कठोर शिक्षा व्हावी
जनावरांशी अशी अमानुष वागणूक करणे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. या कृत्यात सहभागी असणार्यांना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. कल्याण ढोणे, शेतकरी