अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पहाटे साडेतीनच्या सुमारास SNCU मध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट; सहा अर्भकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा धुरामुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत उपचार घेत असलेल्या सहा अर्भकांना पुढील उपचारांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास नवजात शिशु अतिदक्षता विभागातील एका व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यानंतर कक्षात आग लागली आणि काही वेळातच आगीने परिसर व्यापला. घटनेची माहिती मिळताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत कक्षातील नवजात बालकांना बाहेर काढले.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे तीन कक्ष आहेत. प्रत्येक कक्षाची क्षमता 13 नवजात बालकांची असून, तिन्ही कक्ष मिळून 39 बालकांवर उपचार करण्याची व्यवस्था आहे. यापैकी एका कक्षात ही आग लागली. घटनेच्या वेळी त्या कक्षात एकूण नऊ बालके उपचार घेत होती.
कर्मचाऱ्यांनी तातडीने सर्व बालकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दुर्घटनेत तीन चिमुकल्यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. उपचार सुरू असलेल्या काही बालकांच्या हात-पायाला भाजल्याची माहिती असून, त्यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आग लागल्यानंतर आजूबाजूच्या कक्षांमध्ये उपचार घेणाऱ्या काही बालकांनाही खबरदारीचा उपाय म्हणून सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले.
वर्षभरापूर्वीच सुरू झालेल्या विभागाच्या सुरक्षेवर प्रश्न
विशेष म्हणजे, नवजात शिशु अतिदक्षता विभाग अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आला होता. त्यामुळे आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निशामक आणि अग्निरोधक यंत्रणा नेमकी का कार्यान्वित झाली नाही, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
SNCU मध्ये प्रामुख्याने प्री-मॅच्युअर, कमी वजनाची तसेच गंभीर प्रकृती असलेल्या नवजात बालकांवर उपचार केले जातात. त्यामुळे अशा विभागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने बचावकार्य आणि सुरक्षित स्थलांतराची यंत्रणा प्रभावी असणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेनंतर रुग्णालयाच्या आपत्कालीन सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
व्हेंटिलेटरमध्ये स्फोट कशामुळे?
या दुर्घटनेतील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे व्हेंटिलेटरमध्ये नेमका स्फोट कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्यानंतर संबंधित कक्षात तैनात असलेले कर्मचारी नेमके कुठे होते आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी कोणती पावले उचलली, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अग्निशामक यंत्रणा वेळेत का कार्यान्वित झाली नाही, याचाही तपास होणे अपेक्षित आहे. या संपूर्ण घटनेबाबत रुग्णालय प्रशासन काय स्पष्टीकरण देते आणि सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आढळल्यास कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.
आगीत मृत्युमुखी पडलेल्या तीन नवजात बालकांची माहिती
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तीन नवजात बालकांच्या पालकांची माहिती पुढीलप्रमाणे आहे:
- पूजा बोरगे यांचा मुलगा — रा. पुलगाव, वर्धा
- गायत्री प्रफुल चोपडे यांचा मुलगा — रा. मुरखेड, तालुका अंजनगाव सुर्जी
- किरण बेठेकर यांची मुलगी — रा. बोराळा, तालुका चिखलदरा
या दुर्घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तीन नवजात बालकांना जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी समोर आणाव्यात आणि दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस उपायुक्त (DCP) यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि तपासाला सुरुवात केली. या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या प्रशासकीय त्रुटी आणि हलगर्जीपणाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्था IANS ने दिली आहे.
या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना अमरावतीचे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मृत नवजात बालकांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केली. तसेच या कठीण प्रसंगी सरकारकडून पीडित कुटुंबांना पूर्ण मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “अमरावतीमध्ये आज घडलेल्या या दुर्दैवी घटनेने मला अत्यंत दुःख झाले आहे. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे. मृत नवजात बालकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. या अपूरणीय दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या आई-वडिलांना देव देवो, अशी माझी प्रार्थना आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार
सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची
सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या दुर्घटनेत व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि हलगर्जीपणा असल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला. नवजात बालकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या बाबींचा तपास करून नेमक्या त्रुटी कुठे झाल्या, हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
“या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. तसेच या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. याशिवाय महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट तसेच वैद्यकीय उपकरणांच्या सुरक्षा ऑडिटची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे,” असे त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले.
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तीन नवजात बालकांचा जीव गेल्याची ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेतील त्रुटींमुळे आग अधिक पसरली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
“ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. या घटनेबद्दल नेमकं काय बोलावं, हेच मला समजत नाही. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, नव्या इमारतीतील एनआयसीयू (NICU) मध्ये लहान बालकांना इजा झाली आहे. यापूर्वीही मी लहान मुलांना वाचवले आहे. मात्र, येथे अग्निशमन यंत्रणा पुरेशा क्षमतेने सज्ज नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आग अधिक भडकली.
याशिवाय, इन्व्हर्टरला आग लागल्याची माहिती आहे. त्यामुळे कुठेतरी व्यवस्थेच्या पातळीवर त्रुटी राहिल्याचे स्पष्ट होते. येथील अग्निशमन यंत्रणा योग्य प्रकारे सुसज्ज आणि कार्यक्षम असती, तर आग इतकी मोठी झाली नसती,” असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले.