Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > आपले शहर > पुणे

Amit Thackeray

अमित ठाकरेंसह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्ह्यानंतर मोठी कारवाई; पुण्यात दोघांना अटक

पुण्यात अमित ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांवरील गुन्ह्याच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे.


अमित ठाकरेंसह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्ह्यानंतर मोठी कारवाई पुण्यात दोघांना अटक

प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे पोलिसांच्या ताब्यात; अमित ठाकरेंना चौकशीची नोटीस मिळण्याची शक्यता

पुण्यात अमित ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांवरील गुन्ह्याच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. सोमवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर चतुःशृंगी पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या दोन प्रमुख कार्यकर्त्यांना अटक केली. प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ मनसैनिकांविरोधात सोमवारी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी दोन स्थानिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या कारवाईनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.

या कारवाईमागील प्रकरण पुण्यातील एका महाविद्यालयाशी संबंधित आहे. अमित ठाकरे सोमवारी पुणे दौऱ्यावर असताना विद्यार्थ्यांच्या वसतिगृह, कॅन्टीन तसेच इतर सुविधांबाबतच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी प्राचार्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी प्राचार्यांच्या केबिनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही छायाचित्र लावण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यास अमित ठाकरे यांनी आक्षेप घेतल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी प्राचार्यांच्या केबिनमधील पंतप्रधान मोदी यांचा फोटो हटवला.

या घटनेप्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. महाविद्यालयाच्या परिसरात आणि प्राचार्यांच्या केबिनमध्ये परवानगीशिवाय प्रवेश करून घोषणाबाजी केल्याचा आरोप अमित ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांवर करण्यात आला आहे. तसेच प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांशी दमदाटी केल्याचा आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचाही तक्रारीत उल्लेख आहे.

डॉ. राजेंद्र पाटील यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ मनसैनिकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अमित ठाकरे यांच्यावर अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही. मात्र, त्यांना पोलीस चौकशीसाठी नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. दाखल गुन्ह्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे यांसारख्या आरोपांचा समावेश असल्याने पोलिसांकडून प्रथम चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर अमित ठाकरे यांच्याबाबत पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू असून, पुणे पोलिसांच्या मध्यरात्रीच्या अटकेनंतर या प्रकरणाला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related to this topic: