पहिली उचल ४२५० रुपये देण्याची मागणी
किसान सभेच्या नेतृत्वाखाली आंदोलन
परभणी/ पाथरी (All India Kisan Sabha Andolan) : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची पहिली उचल प्रतिटन ४ हजार २५० रुपये द्यावेत तसेच कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे होणारे प्रदूषण रोखावे या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली सोमवारी श्री रेणुका शुगर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. कारखाना प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत दुपारी २ वाजल्यापासून आंदोलकांनी थेट ऊस गव्हाणीत उतरून गव्हाण बंद केली. पहिली उचल ४२५० रुपये मिळाल्याशिवाय कारखाना चालू देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
पाथरी शहरालगत असलेल्या श्री रेणुका शुगर कारखान्याने ऊस उत्पादकांना प्रतिटन ४२५० रुपये पहिली उचल द्यावी, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या राखेचा बंदोबस्त करून प्रदूषण रोखावे यासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हे (All India Kisan Sabha Andolan) आंदोलन करण्यात आले. सकाळपासून कारखान्याच्या गेटसमोर निदर्शने केल्यानंतर आंदोलकांनी सोमवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ऊस गव्हाणीत उतरून गव्हाण बंद केली. त्यामुळे कारखान्याचे कामकाज ठप्प झाले.
दरम्यान दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कारखान्याचे युनिट हेड उमाकांत पौळ यांनी आंदोलनाचे प्रतिनिधी कॉम्रेड राजन क्षीरसागर आणि कॉम्रेड दीपक लिपणे यांच्याशी चर्चा केली. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्या मान्य करण्याची मागणी लावून धरली.
आंदोलकांशी चर्चेदरम्यान उमाकांत पौळ यांनी मागील काही गळीत हंगामाचा संदर्भ देत श्री रेणुका शुगर हा जिल्ह्यातील सर्वाधिक दर देणाऱ्या कारखाना असल्याचे सांगितले. इतर कारखान्यांच्या तुलनेत प्रतिटन ३०० ते ४०० रुपये अधिक दर दिल्याचा दावाही त्यांनी केला. सध्याच्या मागण्यांबाबत वरिष्ठ प्रशासनाला कळवून त्यानंतर निर्णय घेतला जाईल असे सांगत त्यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेऊन कारखाना सुरू होऊ देण्याचे आवाहन केले.
केवळ चर्चेच्या आश्वासनावर आंदोलन मागे घेण्यास आंदोलकांनी तयारी दर्शवली नाही. जिल्ह्यातील इतर कारखान्यांचे ऊसदर कमी असल्याबाबत विचारणा झाली असता जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांना ऊसदराच्या मागणीसाठी निवेदने देण्यात आली असून प्रत्येक कारखान्याविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे (All India Kisan Sabha Andolan) किसान सभेच्या प्रतिनिधींनी यावेळी स्पष्ट केले.