तब्बल १,१०१ बनावट जन्म दाखल्यांचा धक्कादायक प्रकार उघडकीस; SIT चौकशीनंतर चान्नी पोलिसांत गुन्हा नोंद
पातूर : पातूर तालुक्यातील आलेगाव ग्रामपंचायतीमध्ये सन २०२४ ते २०२६ या कालावधीत कोणताही कायदेशीर अभिलेख नसताना संगनमत व गुन्हेगारी कट कारस्थान रचून तब्बल १,१०१ बोगस जन्म दाखले वितरित केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाच्या विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीनंतर अकोला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या तक्रारीवरून चान्नी पोलीस ठाण्यात तत्कालीन व सद्यस्थितीतील चार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसह (ग्रामसेवक) त्यांच्या सहकाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमके काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आलेगाव ग्रामपंचायतीमध्ये जन्माच्या १,१०१ संशयास्पद नोंदी झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद अकोला यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले होते.
विशेष तपास पथकाने केलेल्या सखोल चौकशीत अत्यंत धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.
चौकशीत उघडकीस आलेल्या गंभीर बाबी
१. अभिलेख नसताना दाखले : प्राथमिक तपासणीत ४१ दाखल्यांपैकी २६ दाखल्यांचे मूळ अभिलेख किंवा नोंदवही ग्रामपंचायतीत आढळलीच नाही.
२. अर्ज आणि शुल्काचा पत्ता नाही : १,१०१ जन्म दाखल्यांपैकी एकाही अर्जदाराचा लेखी अर्ज उपलब्ध नाही. तसेच कोणत्याही प्रकरणात विहित शुल्क आकारण्यात आले नसल्याचे तपासात समोर आले.
३. दुसऱ्या आयडीचा वापर : गोळेगावचा स्वतंत्र यूजर आयडी (User ID) असतानाही आलेगाव ग्रामपंचायतीच्या सी.आर.एस. (CRS) पोर्टलच्या आयडीवरून जन्म दाखले देण्यात आले.
४. ‘ॲड ओल्ड इव्हेंट’ पर्यायाचा गैरवापर : २०१६ नंतरच्या जन्म नोंदी नियमानुसार प्रणालीत थेट होणे अपेक्षित असताना, गुन्हेगारी कट रचून ‘ॲड ओल्ड इव्हेंट’ (Add Old Event) या पर्यायाचा गैरवापर करत जुन्या नोंदी दाखवून बनावट दाखले तयार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. आलेगाव येथील रहिवासी नसलेल्या व्यक्तींच्या नावेही हे दाखले देण्यात आले आहेत.
या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची नावे आली समोर
ग्रामपंचायतीमधील कालावधीनिहाय खालील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी (ग्रामसेवक) संगनमत करून हे बनावट दाखले तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
१. आर. एच. देशमुख — तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी; कालावधी : ०१/०१/२०२४ ते ३१/०७/२०२५; नोंदविलेले दाखले : ५००.
२. जे. पी. तायडे — तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी; कालावधी : ०१/०८/२०२५ ते १७/१०/२०२५; नोंदविलेले दाखले : ४६०.
३. कु. पी. एम. निमसरकार — तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी; कालावधी : १८/१०/२०२५ ते ०३/१२/२०२५; नोंदविलेले दाखले : ८९.
४. गणेश जा. जाधव — सद्यस्थितीतील ग्रामपंचायत अधिकारी; कालावधी : ०४/१२/२०२५ पासून; नोंदविलेले दाखले : ४१.
याव्यतिरिक्त केंद्र चालक एन. आर. मोहाडे, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी परवेज मुशरफ खान अय्युब खान, ग्रामपंचायत कर्मचारी नागेश मोहाडे व इतर सहकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे.
चान्नी पोलिसांत गुन्हा दाखल
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत रामराव पवार (वय ५०, रा. अकोला) यांनी सांख्यिकी पर्यवेक्षक शेख वसीम शेख हनीफ यांच्यासह चान्नी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून लेखी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३(५), ३१८(३), ३३६(३), ३३७ आणि ३४०(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा एफआयआर क्रमांक ०३५१/२०२६ असा आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पंढरी घुगे करत आहेत. या मोठ्या घोटाळ्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.