अँड. बळवंतराव जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लातूर (Adv. Balwantrao Jadhav) : मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती असून जनावरांना चारा मिळण्यासाठी हार्वेस्टरने ऊस तोडणी थांबवावी, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते अँड. बळवंतराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात अँड. जाधव यांनी म्हटले आहे की, मराठवाड्यावर दुष्काळ व तीव्रताची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांचे भविष्यात चाऱ्यामुळे हाल होणार आहेत. शेतकऱ्यांची पशुधन धोक्यात आले आहे. मराठवाड्यात विशेषतः लातूर व धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून साखर कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ होणार आहे बहुतांश साखर कारखाने हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करतात. यामुळे जनावरांचा चारा (उसाचे वाडे ) मोठ्या प्रमाणात नष्ट होतो. त्यामुळे हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी न करता कामगारांमार्फत ऊस तोडणी करावी. त्यामुळे कामगारांच्या हातांना काम मिळेल; त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि जनावरांना चारा देखील उपलब्ध होईल. त्यामुळे कारखान्यामार्फत हार्वेस्टरद्वारे होणारी ऊस तोडणी थांबवण्याचे आदेश साखर कारखान्यांना द्यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रति साखर आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनाही पाठवण्यात आलेल्या आहेत.