मानोरा : शिक्षण क्षेत्र मोडकळीस आणण्याचे षड्यंत्र सत्ताधारी पक्ष करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारला वेळ नाही. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी जाब विचारणारे आमदार विधान परिषदेत असणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे उच्चविद्याविभूषित प्रा. अदितीताई ऋषिकेश पोहरे यांना निवडून आणा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते ॲड. ज्ञायक पाटणी यांनी केले.
१७ ऑक्टोबर रोजी सुलेमान उर्दू हायस्कूलसह विविध ठिकाणी पार पडलेल्या शिक्षक संवाद बैठकीत ते बोलत होते.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या प्रा. अदितीताई पोहरे यांच्या प्रचारार्थ युवा नेते ॲड. ज्ञायक पाटणी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरासह तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा केला.

या दौऱ्यात भुली, वाईगोल, शिवणी, विळेगाव आदी गावांतील दहा ते बारा शाळांना भेटी देऊन शिक्षकांशी संवाद साधण्यात आला. प्रचारासाठी भेट देणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रत्येक शाळेत शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. यावेळी प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी प्रा. अदितीताई यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत सक्षम नेतृत्वाची गरज
ॲड. ज्ञायक पाटणी पुढे म्हणाले की, शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय आमदारकीची पेन्शन घेणार नाही, अशी घोषणा करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्राध्यापक अदिती पोहरे या एकमेव उमेदवार आहेत. गेल्या १७ वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची त्यांना पूर्ण जाणीव आहे. त्या विधान परिषदेत आपल्या कामाचा नक्कीच ठसा उमटवतील. त्यामुळे त्यांना प्रथम क्रमांकाचे पसंतीचे मत देऊन विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षकांच्या हक्कांसाठी सक्षम नेतृत्व निवडा
शिक्षक नेते तथा हलीमा एज्युकेशन संस्था सोसायटीचे सचिव इफ्तेखार पटेल म्हणाले की, शिक्षकांच्या हक्कांसाठी सभागृहात सक्षम नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे प्रा. अदितीताई पोहरे यांना निवडून द्यावे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश राठोड, शरद हांडे, मुख्याध्यापक नईम अहमद खान, शिक्षक फरोक अहमद, रहमद खान, शहजाद खान, नवाज खान, अलकमश, गजनफर हुसेन, महम्मद अतिक, सैयद अहमद, मुसद्दीन अहमद यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.