बेलदरी तलाव पाणीउपसा कारवाई

बेलदरी तलावातील अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाची धडक कारवाई

Beldari Lake Water Extraction: सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील पाझर तलाव क्रमांक दोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलदरी तलावातील पाणीसाठा कमी होऊ नये आणि गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

बेलदरी तलावातील अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाची धडक कारवाई

Beldari Lake Water Extraction

 

तलावाभोवतील चार ते पाच शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडली;
कारवाईच्या वेळी तलावात एकही उपसा मोटार आढळली नाही

पानकनेरगाव (Beldari Lake Water Extraction) : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील पाझर तलाव क्रमांक दोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलदरी तलावातील पाणीसाठा कमी होऊ नये आणि गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. तलावातून अनधिकृतरीत्या पाणीउपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तलावाच्या परिसरातील चार ते पाच शेतकऱ्यांची विद्युत जोडणी तोडण्यात आली. मात्र, प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा तलावात पाणीउपसा करणारी कोणतीही विद्युत मोटार आढळून आली नाही.

या (Beldari Lake Water Extraction) कारवाईत मंडळ अधिकारी घूगे साहेब, पानकनेरगाव सज्जाचे तलाठी हर्षवर्धन गव ई, ग्रामसेवक संतोष मेनकुदळे, वीज वितरण कंपनीचे लाईनमन किसन कोकाटे, सेनगाव पोलीस स्टेशनचे बीट जमादार राजेश जाधव, तसेच पोलीस पाटील मूकूल हांडेकर सहभागी झाले होते.

पिण्याच्या पाण्याचा स्रोत धोक्यात येण्याची भीती
यंदा अल्प पावसामुळे बेलदरी तलावात अपेक्षित पाणीसाठा जमा झालेला नाही. अशा परिस्थितीत तलावातून पाणीउपसा झाल्यास उपलब्ध पाणीसाठा आणखी कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. तलावापासून सुमारे २०० मीटर अंतरावर गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाची असलेली जलस्वराज्य योजनेची विहीर आहे. सन २००६ पासून या विहिरीच्या माध्यमातून गावाच्या पाणीपुरवठ्याला आधार मिळत आहे. तसेच जलजीवन मिशनशी संबंधित जलस्रोतही गावासाठी महत्त्वाचे आहेत. या जलस्रोतांवर गावातील सुमारे १० ते १२ हजार लोकसंख्येच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असल्याने तलावातील उपलब्ध पाण्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे. तलावातील पाणीसाठा कमी झाल्यास गावाच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरे आणि वन्यप्राण्यांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.

तलाव परिसरातील वीजजोडण्या तोडल्या

तलावातून अनधिकृत पाणीउपसा (Beldari Lake Water Extraction) होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने तलावाच्या आसपास असलेल्या चार ते पाच शेतकऱ्यांची विद्युत जोडणी तोडल्याची माहिती आहे. तलावालगतच्या खासगी विहिरींमधूनही पाण्याचा उपसा होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच काही शेतकऱ्यांनी मोटारी बंद करून केबल व इतर साहित्य तेथून हलविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी तलावात कोणतीही उपसा मोटार आढळली नाही.

नियमित देखरेखीची ग्रामस्थांची मागणी
बेलदरी तलावात यंदा पाणीसाठा कमी असल्याने उपलब्ध पाणी जपणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतरही तलावावर नियमित देखरेख ठेवावी. तलावातून अनधिकृत पाणीउपसा होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. जलसंपदा किंवा पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, वीज वितरण कंपनी, पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत यांनी समन्वयाने उपाययोजना केल्यास तलावातील पाणीसाठ्याचे संरक्षण करणे शक्य होईल. गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सातत्यपूर्ण देखरेख ठेवण्याची गरज आहे.

शेतकरी प्रतिक्रिया : विठ्ठलराव झूंगरे पानकनेरगांव शेतकरी

“यंदा पाऊस कमी झाल्यामुळे बेलदरी तलावात पुरेसा पाणीसाठा नाही. या तलावातील पाणी जनावरांना आणि वन्यप्राण्यांना पिण्यासाठी उपयोगी पडते. तसेच तलावाजवळच गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर असल्याने पाण्याचा अनधिकृत उपसा होऊ नये. उपलब्ध पाणी जनावरांसाठी आणि गावाच्या पिण्यासाठी जपले पाहिजे. प्रशासनाने तलावावर नियमित लक्ष ठेवून पाणीसाठा सुरक्षित ठेवावा 

“बेलदरी तलावातील पाणीसाठा गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊ नये, याची काळजी प्रशासनासह सर्वांनी घेतली पाहिजे. मात्र, कारवाई करताना प्रत्यक्ष परिस्थितीची खातरजमा करून नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करावी.”
-शेतकरी, शामराव देशमुख पानकनेरगाव