National Highway Authority: चिखली–बुलढाणा–मलकापूर हा महत्त्वाचा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कराळ यांच्या नेतृत्वाखाली
अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे युवासेनेचे निवेदन; आंदोलनाचा इशारा
चिखली (National Highway Authority) : चिखली–बुलढाणा–मलकापूर हा महत्त्वाचा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन २००६ मध्ये सुमारे ३७७ कोटी रुपये खर्चून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे बांधकाम केले होते. सन २००८ मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाले. मात्र वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या लक्षात घेता हा ७१ किलोमीटर लांबीचा बी.ओ.टी. तत्त्वावरील रस्ता आता अपुरा ठरत असून अनेक ठिकाणी धोकादायक बनला आहे.
युवासेनेने निवेदनात नमूद केल्यानुसार, सन २०२१ ते २०२६ या कालावधीत केवळ २० किलोमीटरच्या चिखली–केळवद पट्ट्यात ५२ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये ३८ जण जखमी झाले असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी आणि प्रशासन यांची संयुक्त बैठक बोलावून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच चिखली–बुलढाणा–मलकापूर मार्ग राष्ट्रीय महामार्गात (National Highway Authority) समाविष्ट करून त्याचे रुंदीकरण व सुरक्षिततेची कामे तातडीने हाती घ्यावीत, असेही निवेदनात म्हटले आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या मार्गाच्या प्रश्नावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या प्रमुख मागणीसाठी युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे यांनी पाठपुरावा सुरू केला असून आजच्या आंदोलनामध्ये त्यांच्या सोबत तालुका प्रमुख किसन लाला धोंडगे उपजिल्हाप्रमुख विलास सुरडकर शहर प्रमुख श्रीराम झोरे,प्रितम गैची, शिवाजी पवार, रवि पटेकर,अनिल कराडे प्रदीप वाघ, मनोहर शिंदे नारायण वाणी अशोक राजपूत सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक तहसील कार्यालयासमोर आंदोलनात सहभागी झाले होते.