मलकापूर शहर पोलीस ठाण्यात एका २६ वर्षीय तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर (Woman Harassment) : प्रेमसंबंधादरम्यान सहसंमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांचे गुपचूप व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित करत तरुणीची बदनामी व विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात एका २६ वर्षीय तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांमध्ये होते प्रेमसंबंध
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापुर मधिल एका परिसरात रहिवासी असलेल्या २५ वर्षीय पीडित तरुणीचे आणि रोहिदास नगर येथील संशयित आरोपी अविनाश रोहिदास धामोणे (वय २६) याचे एकमेकांशी ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या प्रेमसंबंधादरम्यान दोघांनी परस्पर सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते.
व्हिडिओ रेकॉर्डिंग करून केली बदनामी
शारीरिक संबंधादरम्यान संशयित आरोपी अविनाश धामोणे याने पीडित तरुणीच्या नकळत मोबाईलवर अश्लील व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर संशयिताने हे अश्लील व्हिडिओ तरुणीच्या व्हॉट्सॲपवर तसेच इतर माध्यमांद्वारे प्रसारित केले. पीडितेच्या संमतीशिवाय हे चित्रीकरण करून ते व्हायरल केल्यामुळे तिची मोठी सामाजिक व कौटुंबिक बदनामी झाली. तसेच आरोपीने तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकाराला कंटाळून पीडित तरुणीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तरुणीच्या तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी संशयित आरोपी अविनाश रोहिदास धामोणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७४, ७७ आणि ३५६(४) अन्वये गुन्हा (अपराध क्रमांक ४१३/२०२६) दाखल केला आहे.
सदर गुन्हा ३० मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास नोंदविण्यात आला. पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहम्मद रिजवान यांनी प्राथमिक कागदपत्रांची पूर्तता केली असून, मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश बेले करीत आहेत.