वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी लोकसेवा हक्क दिनानिमित्त शासकीय सेवांमध्ये पारदर्शकता आणि तत्परतेची गरज बोलून दाखवली. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात विविध विभागांच्या सेवांचा आढावा घेण्यात आला.
वाशिम, दि. २८ एप्रिल — नागरिकांना शासकीय सेवा देताना निश्चित कालमर्यादेचे काटेकोर पालन करत पारदर्शक, तत्पर आणि जबाबदार प्रशासन उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
लोकसेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, महसूल उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, तहसीलदार निलेश पळसकर, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विविध विभागांच्या ऑनलाइन सेवांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना वेळेत व पारदर्शक पद्धतीने सेवा देण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकसेवा हक्काची शपथ घेतली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी शासकीय कामकाजात पारदर्शकता, तत्परता आणि लोकाभिमुखता या त्रिसूत्रीचा प्रभावी अवलंब करण्याचे आवाहन केले. सेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी व कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात महसूल व कृषी विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यात उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, नायब तहसीलदार रंजना गोरे आणि तलाठी दिपक लहाने यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सादरीकरण जिल्हा प्रकल्प प्रमुख सौरभ जैन यांनी केले.