तालुक्यातील तळप बु. येथे दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घराजवळील पुरातन बुरुजात पावसाळ्यात पाणी साचल्याने तो अचानक कोसळला.
तळप बु. (ता. मानोरा) येथील दुर्दैवी घटना
मानोरा : तालुक्यातील तळप बु. येथे दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घराजवळील पुरातन बुरुजात पावसाळ्यात पाणी साचल्याने तो अचानक कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून सतीष तुळशीराम इंगोले (वय ४६) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली.
प्राप्त माहितीनुसार, तळप बु. येथील सतीष इंगोले हे गावातील पुरातन बुरुजाजवळ राहतात. बुधवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजताच्या सुमारास ते बुरुजाजवळ उभे होते, तर त्यांची पत्नी घरासमोर भांडी धुत होती. त्याचवेळी बुरुजाचा काही भाग अचानक कोसळल्याने दोघेही ढिगाऱ्याखाली दबले. या दुर्दैवी घटनेत सतीष इंगोले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर सतीष इंगोले व त्यांच्या पत्नीला शासकीय सामान्य ग्रामीण रुग्णालय, मानोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सतीष इंगोले यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नीला पुढील उपचारासाठी दिग्रस येथे रेफर करण्यात आले.
या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत सतीष इंगोले यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.