असंख्य भाविकांच्या आस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर येथे ‘व्हीआयपी’ दर्शनाच्या नावावर सुरू असलेल्या कथित गैरव्यवहाराचा पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे.
नाशिक (VIP Darshan Fraud) : असंख्य भाविकांच्या आस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर येथे ‘व्हीआयपी’ दर्शनाच्या नावावर सुरू असलेल्या कथित गैरव्यवहाराचा पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मंदिराशी संबंधित विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना अटक करण्यात आली असून, नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे मंदिर परिसरात सुरू असलेल्या अनियमितता उघडकीस येत असून, मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात आधीच एका आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासाचा विस्तार करत पोलिसांनी विश्वस्त कडलग यांना ताब्यात घेत मंगळवारी (दि. १४) न्यायालयात हजर केले. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक राजेश गावित यांनी तपासातील महत्त्वपूर्ण मुद्दे न्यायालयासमोर मांडले. सरकारी बाजूने सहायक सरकारी अभियोक्ता जागृती ठाकरे यांनी युक्तिवाद केला, तर बचाव पक्षातर्फे ॲड. व्ही. एम. काळे यांनी आपली बाजू मांडली.
पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, हा प्रकार केवळ आर्थिक फसवणूक नसून भाविकांच्या धार्मिक भावनांशी संबंधित गंभीर बाब आहे. जादा रक्कम आकारून काही व्यक्तींना तातडीने प्रवेश दिला जात असल्याने अनेक तास रांगेत थांबणाऱ्या सामान्य भाविकांवर अन्याय होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने कडलग यांना २० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
तपासादरम्यान पुण्यातील विमाननगर येथे राहणारे दिनेश दीपक चालके (वय ४०) यांची सहा हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. गोटीराम पेहरे या संशयिताने जलद दर्शनाचे आमिष दाखवून ही रक्कम घेतली होती. त्यानंतर ओम कडलगच्या माध्यमातून त्यांना दर्शन घडवण्यात आले. या प्रक्रियेसाठी प्रवेशद्वारावरील नोंदवहीत ‘कुणाल दीक्षित’ या नावाने खोटी नोंद करण्यात आल्याचेही पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
कारवाईमागे राजकीय हेतूचा संशय?
या प्रकरणात अटक करण्यात आलेले पुरुषोत्तम कडलग हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत. ते सत्ताधारी पक्षाच्या धोरणांवर सातत्याने टीका करत असल्याने, त्यांच्या विरोधात करण्यात आलेली ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा काही समाजमाध्यमांवर करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीतील आचार्य तुषार भोसले यांच्यावरही टीका केली होती.
तक्रार आणि घटनेचा तपशील
नाशिकच्या पंचवटी परिसरातील आनंदा सुरेश मेहेंदळे (वय ४६) यांनी या संदर्भात त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार गोटीराम मनाजी पेहरे, अभिषेक कडलग, ओम कडलग आणि पुरुषोत्तम कडलग या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पेहरे याला १२ एप्रिलपासून पोलिस कोठडी आहे, तर पुरुषोत्तम कडलग यांना १४ एप्रिल रोजी पहाटे अटक करण्यात आली.
मेहेंदळे आणि त्यांचे मित्र राकेश वाघ (रा. मखमलाबाद, पंचवटी) हे ११ एप्रिल रोजी अधिकृत २०० रुपयांचा दर्शन पास घेऊन रांगेत उभे होते. त्यावेळी पेहरे यांनी त्यांच्याशी संपर्क साधत ‘दहा मिनिटांत दर्शन’ करून देण्याचे आमिष दाखवले. रांगेत उभे राहिल्यास चार ते पाच तास लागतील, असे सांगत तीन हजार रुपयांच्या मोबदल्यात जलद दर्शन करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अभिषेक कडलगच्या मदतीने त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला आणि दर्शनानंतर रोख रक्कम स्वीकारण्यात आली. या व्यवहारासाठी कोणतीही अधिकृत पावती देण्यात आली नव्हती, असे फिर्यादीत नमूद आहे.
गैरप्रकाराची कार्यपद्धती
तपासात उघड झालेले प्राथमिक चित्र असे की, रांगेत थांबलेल्या भाविकांशी काही मध्यस्थ संपर्क साधत असत. हे मध्यस्थ भाविकांना कमी वेळात दर्शन घडवण्याचे आमिष दाखवत ठराविक रक्कम निश्चित करत. त्यानंतर संबंधित भाविकांना कडलग आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे पाठवले जात असे. या प्रक्रियेत मंदिरातील प्रवेशद्वारांचा गैरवापर करून भाविकांना आत सोडले जात होते. प्रत्येक भाविकाकडून दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांचे स्टिंग ऑपरेशन आणि उघड झालेले प्रकार
त्र्यंबकेश्वर परिसरात यापूर्वीही अशा तक्रारी समोर येत होत्या. एका महिला भाविकावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्याचदरम्यान फसवणुकीच्या तक्रारी वाढल्यानंतर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेष पथक स्थापन करून गुप्त कारवाईचे आदेश दिले.
पोलिसांनी भाविकांच्या वेशात सापळा रचत तांत्रिक पुरावे गोळा केले. या कारवाईतून तीन हजार ते बारा हजार रुपयांपर्यंत रक्कम घेऊन जलद दर्शन देणे, मंदिराचा ‘पूर्व दरवाजा’ नियमबाह्यपणे उघडणे आणि शंभर ते दीडशे भाविकांना बेकायदेशीर प्रवेश देणे असे प्रकार उघड झाले.
पोलिस कोठडी मागण्यामागील प्रमुख कारणे
• अल्प कालावधीतच अनेक भाविकांची हजारो रुपयांची फसवणूक
• दररोज येणाऱ्या मोठ्या संख्येमुळे लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय
• दीर्घकाळापासून सुरू असलेला संघटित गैरप्रकार
• मुख्य सूत्रधार म्हणून पुरुषोत्तम कडलग यांच्यावर संशय
• उर्वरित रक्कम जप्त करणे बाकी
• आर्थिक व्यवहारांचे प्रमाण आणि वाटप तपासणे आवश्यक
• सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी करणे गरजेचे
पुतण्यांचीही अटक; रॅकेटचा विस्तार उघड
दरम्यान, तपास पुढे जात असताना पोलिसांनी पुरुषोत्तम कडलग यांच्या पुतण्यांनाही ताब्यात घेतले आहे. अभिषेक कडलग आणि ओम कडलग अशी त्यांची नावे असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. एजंटकडून पैसे गोळा करणे आणि त्यानंतर पुरुषोत्तम कडलग यांच्याशी संपर्क साधून भाविकांच्या ‘व्हीआयपी’ दर्शनाची व्यवस्था करणे, ही जबाबदारी हे दोघे सांभाळत असल्याचे उघड झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणातून मंदिर परिसरात ‘व्हीआयपी’ दर्शनाच्या नावावर चालणाऱ्या कथित काळाबाजाराचे जाळे समोर आले असून, तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.