बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भाच्या हवामानात बदल झाला असून तापमानात घट नोंदवण्यात आली आहे.
नागपूर (Vidarbha Weather Alert) : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भाच्या हवामानात बदल झाला असून तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. पूर्व विदर्भासह नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या बदलामुळे विदर्भातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान १ ते ३ अंशांनी घटले असून उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे पूर्वमोसमी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला असून पुढील काही दिवसांत विजांच्या कडकडाटासह ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, या अवकाळी पावसानंतर पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.