Kalamnuri Women Protest: शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या समस्यांमुळे संतप्त महिलांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
कळमनुरी (Kalamnuri Women Protest) : शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या समस्यांमुळे संतप्त महिलांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.
ब्राह्मण गल्लीत सध्या आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून तोही अवेळी होत असल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे. दैनंदिन कामकाज करताना महिलांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियमित पाणीकर भरूनही महिन्यातून केवळ दोन ते तीन वेळाच पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सकाळी 7 ते 9 या निश्चित वेळेत व किमान दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी महिलांनी केली आहे.
पाणीटंचाई सोबतच परिसरातील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. नाल्या तुडुंब भरल्या असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. (Kalamnuri Women Protest) कचरागाडी नियमित येत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया व इतर संसर्गजन्य रोगांचा धोका वाढल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. आठवड्यातून किमान एकदा नाल्यांची साफसफाई, दररोज कचरागाडीची सेवा आणि नियमित स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास (Kalamnuri Women Protest) नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा महिलांनी दिला आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासन या गंभीर समस्यांकडे किती गांभीर्याने लक्ष देते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
सदर निवेदनावर उषा कावडे, कविता कावडे, श्रद्धा देशपांडे, शारदा घोलप, लीला कस्तुरे,गौरी कस्तुरे, शिवानी, माधुरी कुलकर्णी, गीता कावडे, मालती दिवाळकर, वैशाली कावडे, मंजू पांडे, वैशाली लाखकर, रेणुका जोशी, नंदा देशमुख, रजनी अग्रवाल, नालिनी दिवाकर, दिपाली पाध्ये, अंजली कामठकर, माधवी, संगीता कावडे, सुरेखा कावडे, अंजली राऊत, सुमती कावडे यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.