Sai Temple Theft Case: आधी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घ्यायचे आणि त्यानंतर लगेच मंदिराची दानपेटी फोडून रोकडसह मौल्यवान ऐवज लंपास करायचा, असा धक्कादायक प्रकार
मसला पेन येथील साई मंदिरातून ९५ हजारांचा ऐवज लांबवला; चोरी CCTV त कैद
रिसोड (Sai Temple Theft Case) : आधी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घ्यायचे आणि त्यानंतर लगेच मंदिराची दानपेटी फोडून रोकडसह मौल्यवान ऐवज लंपास करायचा, असा धक्कादायक प्रकार रिसोड तालुक्यातील मसला पेन येथील साईबाबा मंदिरात घडला आहे. १९ जुलैच्या रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत अज्ञात चोरट्याने सुमारे ९५ हजार रुपयांचा ऐवज लांबवला असून, चोरीची ही संपूर्ण घटना मंदिरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मसला पेन येथील रहिवासी तेजराव केशवराव शिंदे हे २० जुलै रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ५ वाजेच्या सुमारास साईबाबा मंदिरात गेले होते. त्यावेळी मंदिराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पाहिले असता, दानपेटीचे कुलूप तोडलेले दिसले आणि जमिनीवर चिल्लर पैसे सांडलेले आढळले. अज्ञात चोरट्याने दानपेटीतील सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ९५,००० रुपयांचा मुद्देमाल पळवून नेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सकाळी मंदिरात आलेल्या पुजारी व भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली.
दरम्यान, मंदिरातील CCTV फुटेज तपासले असता, त्यात चोरटा चोरी करण्यापूर्वी साईबाबांचे दर्शन घेताना आणि नंतर दानपेटी फोडताना स्पष्टपणे दिसत आहे. याप्रकरणी तेजराव केशवराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. CCTV फुटेजच्या आधारे शिरपूर पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.