नागपूर शहरातील वाठोडा भागात एक अत्यंत दु:खद आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नागपूर (Turpentine Poisoning) : नागपूर शहरातील वाठोडा भागात एक अत्यंत दु:खद आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाणी समजून चुकून तारपीन (टर्पेंटाइन) पिल्याने अवघ्या दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला असून, यामुळे कुटुंबासह परिसरात शोक वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीडगाव येथे घडली. मृत बालकाचे नाव अद्वविक शाम भदाडे असे आहे. त्याचे वडील शाम भदाडे हे केटरिंगचा व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी रंगकाम करण्यात आले होते. त्यासाठी तारपीन आणण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर उरलेली तारपीनची बाटली घरातील स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आली होती. १२ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास अद्वविक घराबाहेर खेळत होता.
खेळत असताना तो स्टोअर रूमजवळ गेला. तिथे ठेवलेल्या बाटलीतील द्रव पदार्थ पाणी असल्याचा गैरसमज होऊन त्याने ते प्राशन केले. तारपीन पिताच त्याची तब्येत अचानक बिघडू लागली आणि काही वेळातच तो अस्वस्थ झाला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तात्काळ पारडी येथील भवानी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. तेथे उपचार सुरू असतानाच या निरागस बालकाचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भदाडे कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे. किरकोळ निष्काळजीपणामुळे एवढी मोठी दुर्घटना घडल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, वाठोडा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे घरामध्ये ठेवण्यात येणाऱ्या धोकादायक रसायनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तारपीन, आम्ल किंवा कीटकनाशके यांसारखे विषारी पदार्थ लहान मुलांच्या आवाक्याबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवणे अत्यावश्यक आहे. तसेच अशा पदार्थांच्या बाटल्यांवर स्पष्ट सूचना लिहिणे, त्यांना कुलूप लावून ठेवणे किंवा मुलांना सहज पोहोचणार नाही अशा उंच ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. पालकांची थोडीशीही दुर्लक्षता जीवघेणी ठरू शकते, याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा समोर आली आहे.