Parbhani Truck Brake Failure: परभणीमध्ये एका उड्डाणपुलावर ट्रकचा ब्रेक फेल झाला, परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आणि काही जणांचे प्राण वाचले.
५० मिनिटे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी क्रेनच्या मदतीने ट्रक हटवला
परभणी (Parbhani Truck Brake Failure) : शहरातील बसस्थानका समोरील जिंतूर रोड व गंगाखेड रोडला जोडणार्या उड्डाणपुलावर मंगळवार ३१ मार्च रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास मालवाहतूक ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळून जीवितहानी टळली.
घटने बाबत अधिक माहिती अशी की, एमएच २३ एएन २९२० क्रमांकाचा मालवाहतूक करणारा (Parbhani Truck Brake Failure) ट्रक उड्डाणपुलावर चढत असताना (Parbhani Truck Brake Failure) अचानक ब्रेक फेल झाला. यामुळे ट्रक मागे सरकू लागल्याने पुलावरून जाणार्या वाहनधारकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु चालकाने धीर न सोडता प्रसंगावधान राखत ट्रक उड्डाणपुलाच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर आदळवून थांबवला. त्यामुळे मागून येणार्या वाहनांवर होणारा संभाव्य अपघात टळला आणि मोठा अनर्थ टाळण्यात यश आले.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोनि दंतुलवार, पोउपनि बनाट, एएसआय सिद्दिकी यांच्यासह कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजूंनी वाहतूक बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या घटनेमुळे सुमारे ५० मिनिटे उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यानंतर क्रेनच्या साहाय्याने ब्रेक फेल झालेला ट्रक पुलावरून खाली उतरवण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या वेळी कोतवाली पोलिसांचे पथकही घटनास्थळी उपस्थित होते.