सोलापूर शहरालगतच्या बोरामणी परिसरात तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली असून मध्यरात्री आई आणि तिच्या दोन मुलांवर तलवारीने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
सोलापूर (Triple Murder Case) : सोलापूर शहरालगतच्या बोरामणी परिसरात तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली असून मध्यरात्री आई आणि तिच्या दोन मुलांवर तलवारीने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या वादातून महिलेच्या दिराने हे भयंकर कृत्य केल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये गायत्री सुधाकर मस्के, त्यांची मुलगी प्रिया मस्के आणि मुलगा शिवराज मस्के यांचा समावेश आहे.
गायत्री मस्के यांचे पती काही वर्षांपूर्वी निधन पावले होते. त्या आपल्या दोन मुलांसह बोरामणी परिसरात राहत होत्या. त्यांचा दिर पप्पू हा शेजारीच वास्तव्यास होता. मध्यरात्री तो तलवार घेऊन वहिनीच्या घरात घुसला. घर आणि गच्चीला एकच मार्ग असल्याने त्या ठिकाणी सर्वजण गच्चीवर झोपले होते.
याचवेळी आरोपीने अचानक हल्ला चढवला. सुरुवातीला त्याने गायत्री मस्के यांच्यावर तलवारीने वार केले. आईला वाचवण्यासाठी दोन्ही मुलांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यांच्यावरही अमानुषपणे वार केले. या हल्ल्यात तिघेही जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्युमुखी पडले.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून संपूर्ण घर सील करण्यात आले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे बोरामणी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.