दारव्हा–कारंजा मार्गावरील भुलाई–भांडेगाव दरम्यान सुरू असलेल्या वादग्रस्त टोलनाक्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने पुन्हा सोमवार दि. २३ मार्चला ‘टोल फोडो’ आंदोलन करण्यात आले.
पालकमंत्र्यांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न - राहुल ठाकरे
दारव्हा (Toll Protest) : दारव्हा–कारंजा मार्गावरील भुलाई–भांडेगाव दरम्यान सुरू असलेल्या वादग्रस्त टोलनाक्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने पुन्हा सोमवार दि. २३ मार्चला ‘टोल फोडो’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी आंदोलन चिरडण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने पोलिसांकडून दडपशाही करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी केला आहे.
दारव्हा–कारंजा मार्गावरील रस्त्याची अत्यंत खराब अवस्था, अपूर्ण कामे आणि नियमबाह्य टोल वसुली या मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांपासून हा वाद चिघळला आहे. या टोलनाक्याविरोधात यापूर्वीही ११ मार्चला आंदोलन छेडण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकार्यांसोबत दि. १३ मार्चला झालेल्या बैठकीत टोलनाका बंद करण्यावर शिक्कामोर्तबही झाला होता . मात्र, राजकीय दबावापोटी जिल्हाधिकार्यांनी निर्णय फिरविल्याने टोल वसुली सुरूच राहिल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीच्या वतीने पुन्हा सोमवारला ‘टोल फोडो’ आंदोलन करण्यात आले.आंदोलनाची पूर्वसूचना प्रशासनाला मिळाल्याने भुलाई–भांडेगाव टोलनाक्यावर सकाळपासूनच मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान काही ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक जनतेच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच या कारवाईला पालकमंत्र्यांचे आशीर्वाद असल्याचा आरोपही महाविकास आघाडीने केला. दरम्यान, टोल वसुलीमुळे शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडत असल्याने हा टोलनाका तात्काळ बंद करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा केली.यावेळी काँग्रेसचे राहुल ठाकरे, प्रकाश नवरंगे, अतुल राऊत,सय्यद फारूक, मनोहर नवरंगे, मसूद खान, तसेच उबाठा शिवसेना पक्षाचे अजय गाडगे,संतोष ठाकरे, अमोल दुधे आदी पदाधिकार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
दुसरीकडे, या टोलनाक्याच्या मुद्द्यावर राजकीय वातावरणही तापले आहे. शिवसेना शिंदे गटाकडूनही जिल्हाधिकार्यांना निवेदन देत टोलनाका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे टोल नाका बंद करण्यासाठी महाविकास आघाडी आणि शिंदे गट यांच्यात श्रेयवादाची चढाओढ सुरू असल्याच्या प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत.दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दारव्हा–कारंजा मार्गावरील टोलनाका प्रश्न अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.