रिसोड शहरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानपट्टी व किराणा दुकानांवर पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेच्या विशेष पथकाने संयुक्त कारवाई केली.
पोलीस-नगरपरिषदेच्या संयुक्त पथकाची धडक कारवाई; १७ पानपट्टी व किराणा दुकानांवर कारवाई
रिसोड : रिसोड शहरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानपट्टी व किराणा दुकानांवर पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेच्या विशेष पथकाने संयुक्त कारवाई केली. या धडक कारवाईत तब्बल १७ दुकानांवर कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे शहरातील तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ही विशेष कारवाई पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश शेवदा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, सागर भरस्कार यांच्यासह पोलीस कर्मचारी अंभोरे, पीसी राजेश गांगवे, हाके, ठाकरे तसेच रिसोड पोलीस ठाण्याचे अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारीदेखील मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले.
शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या पानपट्ट्या व किराणा दुकानांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री तसेच नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
विशेष म्हणजे, ही कारवाई केवळ एकदाच न करता नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासन व नगरपरिषदेच्या विशेष पथकाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, आगामी काळात आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे.