‘इडियट’ हा शब्द असंसदीय नसल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली.
नाशिकमधील खड्ड्यांविरोधातील उबाठाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राऊतांची केंद्र आणि महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर टीका
‘इडियट’ हा शब्द असंसदीय नसल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाचा संदर्भ देत भारतीय राजकारणातील ‘थ्री इडियट्स’ कोण आहेत, हे जनतेला माहीत असल्याचे राऊत म्हणाले. यापैकी एक महाराष्ट्रात, तर दोन केंद्रात असल्याचा टोला त्यांनी लगावला.
संजय राऊत सोमवारी (17 ऑगस्ट) नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून उबाठा गटाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारसह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. याचवेळी ‘इडियट’ या शब्दावरून सुरू असलेल्या राजकीय वादावरही त्यांनी भाष्य केले.
‘इडियटला इडियटच म्हटलं पाहिजे’
केंद्रीय मंत्रिमंडळातील काही सदस्यांना ‘इडियट’ म्हटल्याच्या राऊतांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी त्यांना भारतीय राजकारणातील ‘थ्री इडियट्स’ कोण, असा प्रश्न विचारला. त्यावर राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट टीका केली.
‘ज्यांना इडियट म्हणायचे आहे, त्यांना इडियटच म्हटले पाहिजे’, अशी भूमिका राऊतांनी मांडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माफी मागण्याची मागणी करणे हेच ‘इडियटपणाचे लक्षण’ असल्याचे ते म्हणाले. वंदे मातरमचा इतिहास आणि त्यामागील ऊर्जा स्रोत याबाबत माहिती नसल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना आधी स्वतः माफी मागण्याचा सल्ला दिला.
संसदेतून पळून गेल्याचा आरोप करत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. देशात वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असताना मंत्री इकडेतिकडे फिरत असल्याचे ते म्हणाले. लाल किल्ल्यावरील कार्यक्रमादरम्यान टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याचा संदर्भ देत मोदींवरही त्यांनी निशाणा साधला आणि अशा परिस्थितीत नेमके कोणाला ‘इडियट’ म्हणायचे, असा सवाल उपस्थित केला.
‘एक महाराष्ट्रात, दोन केंद्रात’
‘इडियट’ हा असंसदीय शब्द नसल्याचे स्पष्ट करत संजय राऊत यांनी ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाचा दाखला दिला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते, असे राऊत म्हणाले.
याच संदर्भाचा आधार घेत त्यांनी भारतीय राजकारणातील ‘थ्री इडियट्स’बाबत टोला लगावला. त्यांच्या मते, ‘एक इडियट महाराष्ट्रात आहे आणि दोन केंद्रात आहेत.’ या वक्तव्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील तसेच केंद्रातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.