Tagarkheda Health Camp: तगरखेड्यातील आरोग्य शिबिरामध्ये ३७५ जणांची आरोग्य तपासणी झाली. डॉ. श्रीधर अहंकारी यांनी संतुलित आहार-विहाराचे महत्त्व स्पष्ट केले.
सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार-विहार आवश्यक: डाॅ. श्रीधर अहंकारी
औराद शहाजानी (Tagarkheda Health Camp) : बदलत्या जीवनशैलीमुळे विशेषतः तरुण पिढीत ह्रदयविकाराचे वाढते प्रमाण चिंताजनक असून सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार-विहार आवश्यक असल्याचे प्रतिपादन डाॅ.श्रीधर अहंकारी, निलंगा यांनी केले.
शिक्षणमहर्षी विश्वनाथराव वलांडे गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त औराद शहाजानी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरात 'ह्रदयाची काळजी' याविषयावरील मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बस्वराज वलांडे, संचालक मडोळय्या मठपती, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डाॅ.शंकर कल्याणे, डाॅ.योगेश जाधव, डाॅ.किरण माने, डाॅ.ज्ञानेश्वर कदम, डाॅ.सुनील पोतदार, डाॅ.सविता भारती, डाॅ.शरद मठपती, उपसरपंच मदन बिरादार, वैजनाथ वलांडे इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना डाॅ. श्रीधर अहंकारी यांनी नियमित व्यायाम, मैदानी खेळास प्राधान्य, जंक फूड व व्यसनांपासून दूर रहावे असे सांगितले. मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी घातक असून मोबाईलचा मर्यादित व सुयोग्य वापर करावा. प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत जागरूक रहाण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डाॅ.ज्ञानेश्वर कदम व रंजीत सुर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्र.प्राचार्य डॉ.शंकर कल्याणे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डाॅ.आनंद मुसळे यांनी केले. आरोग्य शिबीराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्राचा सर्व स्टाफ, तगरखेडा ग्रामपंचायत व ग्रामस्थ, आशा कार्यकर्ती, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ इत्यादींनी मौलिक परिश्रम घेतले.
औषधोपचार व अनुषंगिक सल्ला...
प्रस्तुत आरोग्य शिबिरात (Tagarkheda Health Camp) लातूर येथील पोटविकार तज्ज्ञ डाॅ.किरण माने व किडनी तज्ज्ञ डाॅ.योगेश जाधव, निलंगा येथील मधुमेह तज्ज्ञ डाॅ.श्रीधर अहंकारी व ह्रदयविकार तज्ज्ञ डाॅ.सुनील साळुंके, औराद शहाजानी येथील बालरोग तज्ज्ञ डाॅ.ज्ञानेश्वर कदम व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुनील पोतदार, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तगरखेडा येथील डाॅ.सविता भारती आणि सर्व डाॅक्टरांचा वैद्यकीय स्टाफ यांनी ३७५ जणांची आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, ई.सी.जी., औषधोपचार व अनुषंगिक सल्ला - मार्गदर्शन करण्यात आले.