Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

Superstition

‘चेटकिणी’च्या अफवांनी भालकी हादरले; पोलिसांसमोर सत्य शोधण्याचे आव्हान

कर्नाटक सीमावर्ती भागातील भालकी शहरात गेल्या काही दिवसांपासून जादूटोणा आणि ‘चेटकिणी’च्या चर्चेला उधाण आले.


‘चेटकिणी’च्या अफवांनी भालकी हादरले पोलिसांसमोर सत्य शोधण्याचे आव्हान

घरांच्या परिसरात नारळ, लिंबू, केळीसह संशयास्पद वस्तू आढळल्याने नागरिकांत भीती; जादूटोण्याच्या चर्चेला उधाण

देवणी : कर्नाटक सीमावर्ती भागातील भालकी शहरात गेल्या काही दिवसांपासून जादूटोणा आणि ‘चेटकिणी’च्या चर्चेला उधाण आले असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध भागांत घरांच्या आसपास नारळ, केळी, लिंबू तसेच अन्य संशयास्पद वस्तू आढळून येत असल्याचे नागरिक सांगत आहेत. या वस्तू जादूटोण्यासाठी वापरल्या जात असल्याची चर्चा असली, तरी या प्रकारामागील नेमके सत्य अद्याप समोर आलेले नाही.

गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी शहरातील विविध भागांत काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची चर्चा आहे. काही घरांच्या परिसरात नारळ, लिंबू, केळी आणि अन्य वस्तू टाकलेल्या आढळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनांना जादूटोण्याशी जोडले जात असल्याने विशेषतः महिला, वृद्ध आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, एखाद्या व्यक्तीला त्रास व्हावा किंवा तिच्या मानसिक शांततेवर परिणाम व्हावा, या उद्देशाने काहीजण जादूटोणा करण्यासाठी व्यक्तींना बोलावून घेत असल्याचीही चर्चा शहरात आहे. मात्र, या सर्व चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे अफवा, अंधश्रद्धा आणि प्रत्यक्षात घडलेल्या घटनांमध्ये नेमका फरक काय आहे, हे स्पष्ट करण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

अफवा की नियोजित प्रकार? तपासाची गरज

घरांच्या परिसरात संशयास्पद वस्तू कोण टाकत आहे, त्या वस्तू कोणत्या उद्देशाने ठेवण्यात येत आहेत आणि रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे. तसेच या प्रकारामागे अंधश्रद्धा पसरविण्याचा हेतू आहे की एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

केवळ ‘चेटकीण’ असल्याच्या चर्चेवर विश्वास ठेवून कोणत्याही व्यक्तीला संशयाच्या आधारे लक्ष्य करणे किंवा तिच्यावर आरोप करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद प्रकार आढळल्यास स्वतःहून कोणतीही कारवाई न करता पोलिसांना माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सीमावर्ती भागातील पोलिसांसमोर आव्हान

भालकी शहरात सुरू असलेल्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासोबतच या प्रकारामागील खरा सूत्रधार कोण, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करणे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जादूटोणा, अंधश्रद्धा किंवा भीतीचे वातावरण निर्माण करून नागरिकांची फसवणूक अथवा मानसिक छळ केला जात असल्याचे तपासात आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

दरम्यान, ‘चेटकिणी’च्या चर्चेमागे नेमका कोणता प्रकार सुरू आहे, हा केवळ अंधश्रद्धेचा परिणाम आहे की त्यामागे एखादे नियोजनबद्ध षडयंत्र आहे, याचा तपासातून उलगडा होणे आवश्यक आहे. सत्य समोर येईपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगणे गरजेचे आहे.

Related to this topic: