Minister Diliprao Deshmukh: विकासरत्न विलासराव देशमुख व बब्रुवान काळे यांनी ४० वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचे महावृक्षात रूपांतर झाले आहे. ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडत आहेत.
मांजराच्या सर्वसाधारण सभेत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची ग्वाही
लातूर (Minister Diliprao Deshmukh) : विकासरत्न विलासराव देशमुख व बब्रुवान काळे यांनी ४० वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचे महावृक्षात रूपांतर झाले आहे. ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडत आहेत. शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुधारले पाहिजे. ते पाहत असताना मांजरा परिवाराने पहिले प्राधान्य शेतकरी, त्या व्यवस्थापनाचे कर्मचारी यांचे हित जोपासण्यावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घ्यावे. गाळप झालेल्या ऊसाला ३ हजार १७७ रूपये रूपये प्रतिक्विटल बिल शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहे. त्यामुळे आगामी काळात गाळपास येणाऱ्या ऊसालाही अधिक भाव देऊ, असे प्रतिपादन विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख (Minister Diliprao Deshmukh) यांनी केले.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळाची २०२५-२६ ची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. १८) पार्वती मंगल कार्यालयात पार पडली. याप्रंसगी ते बोलत होते.
या प्रसंगी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, जिल्हा बँक अध्यक्ष धिरज देशमुख, माजी आमदार तथा विलास साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, महापौर जयश्रीताई सोनकांबळे, मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, लातूर जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणा चे चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, श्रीशैल्य उटगे, मांजरा परिवारातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हार्वेस्टर चालकांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते यावर्षीच्या बरोबरच पुढच्या वर्षीचेही हप्ते बँकेला अदा केले आहेत. ही ताकद केवळ साखर कारखाने व जिल्हा बँकेमुळे निर्माण झाली आहे. साखर कारखाने, जिल्हा बँकेमुळे लातूर पॅटर्नचे वेगळेपण आपणाला पहायला मिळत आहे. केवळ साखर कारखाने आर्थिक व्यवस्थापनामळे नफ्यात असले तरी लातूर जिल्ह्यातील शेतकरी सक्षम झाला पाहिजे, असे सांगून दिलीपराव देशमुख म्हणाले की, काम करत असताना काही जण टीका करतात. त्यांना आपण आपल्या कामातून उत्तर दिले पाहिजे.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, मांजरा साखर कारखाना लोकनेते विलासराव देशमुख यांच्यासाठी जीव की प्राण आहे. म्हणून आज मांजरा परिवारातील सर्वच कारखाने उत्तम रीतीने चालत आहेत. ज्या उद्देशाने मांजरा कारखान्याची उभारणी केली तो उद्देश साध्य करण्यासाठी या परिवारातील सर्वच साखर कारखाने अत्यंत शिस्तीत आणि काटेकोर नियोजनात वाटचाल करीत आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष धिरज देशमुख यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी मांजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई, रेणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी व्ही मोरे, जागृती शुगर चे जनरल मॅनेजर गणेश येवले, मांजरा साखर कारखान्याचे संचालक श्रीशैल उटगे, कैलास पाटील, तात्यासाहेब देशमुख, वसंत उफाडे, नवनाथ काळे, धनराज दाताल, सदाशिव कदम, अनिल दरकसे, मदन भिसे, ज्ञानेश्वर पवार, नीलकंठ बचाटे, सचिन शिंदे, भैरू कदम, श्रीकृष्ण काळे, सुरेश चव्हाण उपस्थित होते प्रास्ताविक उपाध्यक्ष अशोक काळे यांनी केले. सभेचे विषयांचे वाचन कार्यकारी संचालक पंडित देसाई यांनी केले. आभार संचालक कैलास पाटील यांनी मानले.
कर्मचाऱ्यांना १० टक्के दिवाळी बोनस
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १० टक्के दिवाळी बोनस जाहीर करताच या निर्णयाचे टाळयाच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.