अक्षय तृतीया निमित्त रविवार १९ एप्रिल रोजी होणारे दैठणा आणि बाभुळगाव येथील दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी सरपंच, पोलीस आणि आरोग्य विभागाची कामगिरी
परभणी (Stop Child Marriage) : अक्षय तृतीया निमित्त रविवार १९ एप्रिल रोजी होणारे दैठणा आणि बाभुळगाव येथील दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. यामध्ये परभणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने समुपदेशन करुन बालविवाह रोखण्यात महत्वाची कामगीरी बजावली. सरपंच, पोलीस आणि आरोग्य विभागाची कामगिरी महत्त्वाची ठरली.
ग्रामपंचायत दैठणा येथे अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून बालविवाह रोखण्यात यश मिळवले. प्रभाकर उत्तमराव कच्छवे यांच्या मुलीचे लग्नाचे वय कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित अधिकार्यांनी त्यांच्या घरी भेट देत समुपदेशन केले. यावेळी सरपंच उज्वलाताई उदयसिंग कच्छवे, पोलीस पाटील जयश्री कच्छवे, आरोग्य विस्तार अधिकारी शेळके, पोलीस जमादार बी.बी. कुकडे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी एकत्रितपणे पालकांना कायद्याची माहिती देत बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. त्यानंतर पालकांनी विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. याचप्रमाणे बाभुळगाव येथेही अशाच प्रकारे शिवाजी शंकर पवार यांच्या घरी होणारा बालविवाह थांबवला. आई - वडिलांनी स्वखुशीने विवाह पुढे ढकलला. यासाठी गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, विस्तार अधिकारी स्वप्निल पवार, आर. सुर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी रेंगे एस. एन., दैठणा पोलीस उपनिरीक्षक बी. एस. मुंडे यांनी विशेष प्रयत्न करुन दोन्ही बाल विवाह रोखले. या घटनांमुळे परिसरात बालविवाहा विरोधात जनजागृती वाढत असून अशा प्रथांना आळा बसवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.