Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

Statue Inauguration

परभणीच्या पाथरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला

पाथरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रशासनाची अंतिम परवानगी मिळण्यापूर्वीच रविवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला.


परभणीच्या पाथरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला

Statue Inauguration |

अंतिम परवानगीपूर्वी पहाटे उभारणी; आ. सईद खान यांचा पुढाकार, खा. संजय जाधव यांच्या उपस्थितीत अनावरण

परभणी (Statue Inauguration) : पाथरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रशासनाची अंतिम परवानगी मिळण्यापूर्वीच रविवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार सईद खान यांच्या पुढाकारातून हा पुतळा उभारण्यात आला असून, सकाळी खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचे जाहीर अनावरण करण्यात आले.

पाथरीत नियोजित चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आल्याची माहिती समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होताच शिवप्रेमींनी चौकाकडे मोठी गर्दी केली.

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६१ आणि ५४८-बी यांच्या टी-पॉइंटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा, अशी स्थानिकांची मागील ४० वर्षांपासूनची मागणी होती. अनेक वर्षांपासून या ठिकाणी 'नियोजित पुतळा स्थळ' असा फलकही लावण्यात आला होता.

आमदार सईद खान यांनी याच ठिकाणी शिवरायांचा पुतळा उभारण्याचा संकल्प करून सहा महिन्यांपूर्वी आकर्षक चबुतरा व संरक्षण भिंतीचे काम पूर्ण केले होते. पुतळाही तयार होता; मात्र काही प्रशासकीय परवानग्या प्रलंबित असल्यामुळे त्याची स्थापना रखडली होती.

दरम्यान, विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याशिवाय शपथ घेणार नाही, असा निर्धार सईद खान यांनी केला होता. त्यानुसार रविवारी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास खासगी वाहनातून पुतळा शहरात आणण्यात आला आणि क्रेनच्या सहाय्याने नियोजित चबुतऱ्यावर बसविण्यात आला. मोजक्या विश्वासू सहकाऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. प्रशासनाला याची पूर्वकल्पना नव्हती, अशीही माहिती समोर आली आहे.

सकाळी सुमारे ११.४५ वाजता खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सईद खान यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ढोल-ताशे, वाद्यवृंद, फटाक्यांची आतषबाजी आणि "जय भवानी, जय शिवाजी"च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पुतळा परिसराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष आसेफ खान, उपनगराध्यक्ष आलोक चौधरी, शिवसेना शहरप्रमुख लालू खान, नाना टाकळकर, एकनाथ शिंदे, बालाजी कुराडे, प्रल्हादराव चिंचाणे, नगरसेवक अमोल भालेपाटील, गोविंद हरकळ, वैजनाथ कोल्हे, विक्रम गायकवाड, संतोष गलबे, उदय भिसे, शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक तसेच शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेले हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.

"सईद खान यांनी पाथरीकरांचे चार दशकांचे स्वप्न पूर्ण केले" – खा. संजय जाधव

"महामार्गाचे काम सुरू असताना या ठिकाणी पुतळ्यासाठी जागा आरक्षित करणाऱ्यांचे अभिनंदन. अनेक वर्षांपासून पाथरीकरांची इच्छा होती की या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा. आमदार सईद खान यांनी ते स्वप्न पूर्ण केले आहे. काही कामे जात, पात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन करावी लागतात. सईद खान हे शिवरायांचे मुस्लिम मावळे आहेत. आज पाथरीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे," असे खासदार संजय जाधव यांनी सांगितले.

"शिवरायांचा पुतळा बसवल्याशिवाय शपथ घेणार नव्हतो" – आ. सईद खान

"या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनातून परवानगी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हा पुतळा स्वखर्चाने उभारण्यात आला आहे. मी मनाशी ठरवले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याशिवाय विधान परिषद सदस्य पदाची शपथ घेणार नाही. आज ते स्वप्न पूर्ण झाले," असे आमदार सईद खान यांनी सांगितले.

​​​​​​​

Related to this topic: