महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला.
परीक्षेत ८२.६६ टक्के मुले उत्तीर्ण; जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८७.२४ टक्के
वर्धा (SSC Result Wardha) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला. वर्धा जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या निकालात मुली आघाडीवर आहेत. दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारावीतही मुलींनी निकालात आघाडी घेतली होती. जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८७.२४ टक्के लागला आहे. दहावीमध्ये ९२.१० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून ८२.६६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याने परीक्षार्थ्यांना उत्सुकता लागलेली होती. दुपारच्या सुमारास दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी इंटरनेटवर निकाल पाहण्यास सुरुवात केली. निकालाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
वर्धा जिल्ह्यात इयत्ता दहावीला १५ हजार २९१ परीक्षार्थी प्रवेशित होते. त्यातील १५ हजार १५१ परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली. जिल्ह्यातील १३,२१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रावीण्य श्रेणीत २,५६८, प्रथम श्रेणीत ४,०८६ तर ४,४७६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत. २,०८८ परीक्षार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झालेत. या निकालाची टक्केवारी ८७.२४ टक्के आहे. नागपूर विभागात वर्धा जिल्हा चौथ्या स्थानावर आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि त्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी आहे.
दहावीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि इंटरनेटवर निकाल पाहिला. दहावीची परीक्षा विद्यार्थी जीवनात अतिशय महत्त्वाची ठरते. येथून वेगवेगळ्या शाखांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
यावर्षी जिल्ह्याच्या निकालाच्या टक्केवारीत मागील वर्षाच्या तुलनेत घसरण झाली आहे. मागील वर्षी वर्धा जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८८.८६ टक्के जाहीर झाला होता. यावर्षी ८७.२४ टक्के निकाल लागलेला आहे. यासोबतच नागपूर विभागातील क्रमवारीतही घसरण झाली आहे. मागील वर्षी तिसऱ्या क्रमांकावर असलेला वर्धा जिल्हा यावर्षी चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.