अभिमानास्पद यशानंतर मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते ऋषिकेश हलगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी गावाने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. गावातील चिरंजीव ऋषिकेश प्रकाश हलगे याची नॅशनल स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पटियाला मार्फत स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI), बेंगळुरू येथे होणाऱ्या एक वर्षाच्या प्रतिष्ठित डिप्लोमा कोर्ससाठी निवड झाली आहे. या अभिमानास्पद यशानंतर मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते ऋषिकेश हलगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
हा डिप्लोमा कोर्स मिळवणे अत्यंत स्पर्धात्मक मानले जाते. यासाठी उमेदवाराकडे B.P.Ed. पदवी असणे आणि राष्ट्रीय स्तरावर खेळाचे प्रतिनिधित्व केलेले असणे बंधनकारक आहे. त्यानंतर ऑनलाइन परीक्षा, ऑफलाइन परीक्षा, मुलाखत, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि खेळातील कामगिरी या सर्व टप्प्यांवर कठोर गुणांकन करूनच अंतिम निवड केली जाते. प्रत्येक राज्यातून अत्यंत मर्यादित जागा उपलब्ध असल्याने ही निवड अधिकच मोलाची ठरते.
ऋषिकेशने या सर्व टप्प्यांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करून ही जागा पटकावली. या एक वर्षाच्या डिप्लोमा प्रशिक्षणानंतर त्याला प्रो कबड्डी आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक होण्याचा मार्गही त्याच्यासाठी खुला होणार आहे. याशिवाय स्वतःची क्रीडा अकादमी सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्रही त्याला या कोर्समधून प्राप्त होणार आहे.
ऋषिकेशच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी अभिमान व्यक्त केला आहे. त्याच्या अथक परिश्रमाला आज यशाची सुंदर किनार लाभली असून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावाकडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत. पिंपळदरी गावासाठी हा क्षण निश्चितच अभिमानास्पद आहे.