Solar High Mast Light: वाशिम जिल्ह्यातील २० गावांमध्ये सोलर हायमस्ट लाईट बसविण्यासाठी २ कोटींचा निधी मंजूर केल्यानंतर भ्रष्टाचाराचा गैरवापर झाल्याचे प्रकरण मंत्रालयात पोहचले.
सा. बां. प्रादेशिक विभाग मंत्रालयाचे कक्ष अधिकारी यांचे मुंबई प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांना पत्र
मानोरा (Solar High Mast Light) : वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेअंतर्गत वाशिम जिल्हयातील एकूण २० गावामध्ये सोलर हायमस्ट लाईट बसविणे या कामाकरीता शासनाकडून अंदाजे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या विद्युत कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य) वाशीम हे अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यता प्रदान करू शकत नाही,तरी सुध्दा सा. बां. (स्थापत्य) विभाग, कार्यकारी अभियंता शुभम जोशी यांनी सा. बां. विद्युत विभाग, यवतमाळ यांच्याशी कोणतेही पत्रव्यवहार न करता आणि तांत्रिक मान्यता न घेता स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करून कामे मंजूर करत अनियमितता करण्यात आलेल्या कामाचे देयके अदा केले आहे. तसेच स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबवता जीएम पोर्टलचा वापर करून एकाच अमरावती येथील सिटी लिंट या खाजगी कंपनीला कामे दिली आहे.
इतर पात्र ठेकेदारांना संधी न देता ठराविक कंपनीला अनुचित लाभ मिळवून दिला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्या प्रकरणी सदरील शासकीय प्रकरणात विभागीय समितीची नेमणूक करून केलेल्या कामाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी, असे तक्रार निवेदन सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता यांना प्रकाश नामदेवराव राठोड यांनी दिल्यावरही चौकशी होत नसल्याने सदर प्रकरणाची तक्रार महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी मंदार कोचरेकर यांच्याकडे पोहोचताच त्यांनी सा. बां. विभाग मुंबई प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधिक्षक अभियंता (विद्युत) तथा समन्वय अधिकारी यांना लेखी पत्र देऊन तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल शासनास तात्काळ सादर करण्याचे कळविले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वाशिम जिल्हयातील २० गावामध्ये सोलर हायमस्ट लाईट बसविणे या कामाकरीता तांडा सुधार योजनेअंतर्गत सन २०२३ - २४ शासन निर्णय क्र. तांसुयो २०२४ / प्र. क्र. ३०९ दि. १९ मार्च रोजी २०२४ परिपत्रकानुसार शासनाकडून अंदाजे २ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. विद्युत कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य) वाशीम हे अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यता प्रदान करू शकत नाही. तरी सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाचे (स्थापत्य) कार्यकारी अभियंता शुभम जोशी यांनी अधिकृत तांत्रीक मान्यता प्रदान करणाऱ्या सा. बां. विद्युत विभाग यवतमाळ यांच्याशी कोणतेही पत्रव्यवहार न करता आणि तांत्रिक मान्यता न घेता स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करून कामे मंजूर करत कामाचे देयके अदा केले आहे. तसेच स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबवता जीएम पोर्टलचा वापर करून एकाच अमरावती येथील सिटी लिंट या खाजगी कंपनीला कामे दिली आहे. इतर पात्र ठेकेदारांना संधी न देता ठराविक कंपनीला अनुचित लाभ मिळवून दिला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत कार्यकारी अभियंता (स्थापत्य) वाशिमचे शुभम जोशी यांनी लाखो रुपयाचा भ्रष्ट्राचार केला आहे. तसेच सा. बां. विभाग वाशीम यांच्याकडे कोणताही विद्युत विभागाचा अभियंता किंवा तांत्रिक बाबीचा कुशल कर्मचारी नसतांना त्यांनी सोलर हायमस्ट लाईटची कामे केलेली आहे. यामुळे सबंधित गावातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
नियम बाहय प्राकलन, तांत्रिक मंजुरी शिवाय कामाचे आदेश, स्पर्धारहित पद्धतीने ठेका देणे व शासनाची दिशाभूल करून सार्वजनिक निधीचा गैरवापर होणे, ही बाब विभागाच्या प्रतिमेला धक्का देणारी असुन यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान झाले आहे. कामासंदर्भातील सर्व नोंदी एम बी बुक, बिल, देयक, जी एम पोर्टल कागदपत्रे, व सबंधित फाईल यांची बारकाईने तपासणी करण्यात यावी, तसेच सदर कामाची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार करण्यात यावा. सदरील संपूर्ण प्रकरणाची विभागीय स्तरावर सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करत दोषी आढळल्यास कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीचे तक्रार निवेदन सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता यांच्याकडे करण्यात आली होती.
परंतु सदर प्रकरणात कोणत्याही प्रकरणाची विभागीय स्तरावरून चौकशी होत नसल्याने तक्रारकर्ता प्रकाश राठोड यांनी महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी मंदार कोचरेकर यांच्याकडे तक्रार दिली असता त्याची गांभीर्याने दखल घेत वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये वाशिम जिल्हयातील एकूण २० गावामध्ये सोलर हाय मस्ट लाईट बसविण्याच्या कामामध्येभ्रष्ट्राचार केल्याबाबतची चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल शासनास सादर करण्याचे लेखी पत्राद्वारे मुंबई प्रादेशिक विद्युत मंडळ सा. बां. विभागाचे अधिक्षक अभियंता (विद्युत) तथा समन्वय अधिकारी लेखी पत्राद्वारे कळविले आहे. मुंबई मंत्रालयातून जारी केलेल्या आदेशाच्या पत्रावरून सखोल चौकशी होऊन सबंधित कार्यकारी अभियंता व कर्मचाऱ्यावर कोणती कार्यवाही होणार याकडे संपूर्ण वाशिम जिल्हयाचे लक्ष लागले आहे.