राज्य शासनाच्या वतीने मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बस सेवेबाबत एक गंभीर प्रकार रविवारी समोर आला.
पातूर (Short Circuit Incident) : राज्य शासनाच्या वतीने मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बस सेवेबाबत एक गंभीर प्रकार रविवारी समोर आला. अकोला–परभणी मार्गावर धावणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संबंधित बस पातूर बसस्थानकावरच थांबून राहिली आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक बस अकोल्याहून परभणीकडे नियमित फेरीसाठी निघाली होती. प्रवासादरम्यान पातूर येथे बस पोहोचताच तिच्या विद्युत यंत्रणेत बिघाड निर्माण झाला. अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे चालकाने तत्काळ बस थांबवून पुढील धोका टाळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, बस अचानक बंद पडल्याने आत बसलेल्या प्रवाशांची मोठी अडचण झाली. काही काळ प्रवासी बसस्थानकावरच अडकून पडले होते. नंतर एस.टी. प्रशासनाने पर्यायी बसची व्यवस्था करून प्रवाशांना पुढील प्रवासासाठी पाठविण्यात आले. तरीही या प्रकारामुळे प्रवाशांना उशीर आणि त्रास सहन करावा लागला.
राज्य शासनाने पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासासाठी इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या असल्या, तरी अशा तांत्रिक बिघाडांच्या घटनांमुळे या सेवेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संबंधित विभागाने अशा घटनांची गांभीर्याने दखल घेऊन बसेसची नियमित तपासणी व देखभाल करणे आवश्यक असल्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर एस.टी. महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून बसची तपासणी करण्यात आली असून बिघाडाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.